
नियतीचे खेळ खरोखरच अजब असतात, याची प्रचिती उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात आली आहे. ज्या माऊलीला कुटुंबियांनी मृत मानून तिचे अकरा वर्षे श्राद्ध घातले, तीच आई अचानक जिवंतपणे घरासमोर उभी ठाकली, तर काय होईल? हा केवळ एखाद्या चित्रपटाचा भाग नसून बागपतच्या एका कुटुंबात घडलेला अद्भूत चमत्कार आहे. 11 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या या वृद्ध मातेच्या पुनरागमनाने संपूर्ण परिसरात आनंदाला उधाण आले आहे.
ही कहाणी आहे बागपत येथील 85 वर्षीय परमेश्वरी देवी यांची. 2015 मध्ये त्या अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना शोधण्यासाठी आकाश-पाताळ एक केले, मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत. अखेर एका अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून कुटुंबियांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि दरवर्षी त्यांचे वर्षश्राद्धही करू लागले. यंदाही श्राद्ध पक्षाच्या दिवशी घरातील लोक पुजेची तयारी करत असतानाच, अचानक परमेश्वरी देवी आपल्या घराच्या दारात हजर झाल्या.
परमेश्वरी देवी यांना पाहताच घरातील सदस्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. सुरुवातीला सर्वजण थक्क झाले, पण ही आपलीच आई असल्याचे सजताच सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांचा मुलगा आणि नातवंडांनी तातडीने डीजे (DJ) बोलावला आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढली. ज्या घरात कालपर्यंत दुःखाचे सावट होते, तिथे आता सण साजरा होत असून ग्रामस्थांनीही या ‘चमत्कारी’ पुनरागमनाचे साक्षीदार होत आनंद व्यक्त केला.
परमेश्वरी देवी या गेल्या 11 वर्षांपासून हरिद्वारमधील एका आश्रमात होत्या. तिथेच त्यांना काही लोकांनी ओळखले आणि त्यांच्या घराचा पत्ता मिळवून त्यांना बागपतला पोहोचवले. विज्ञानाच्या युगात ही घटना एखाद्या दैवी चमत्कारापेक्षा कमी नाही, अशी भावना गावकरी व्यक्त करत आहेत. ज्या आईचे अस्तित्व केवळ फोटोंमध्ये उरले होते, ती आता पुन्हा आपल्या कुटुंबात परतल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे.























































