
बांगलादेशातील व्यस्त अशा ढाका-चट्टोग्राम महामार्गावरील पाडुआ बाजार क्रॉसिंगवर एक भीषण अपघात घडला आहे. ढाक्याच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान रेल्वेने रेल्वे रुळावर आलेल्या बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडुआ बाजार येथील रेल्वे क्रॉसिंगवर बस अचानक रुळावर आली असता हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला. धक्कादायक बाब म्हणजे, धडक बसल्यानंतरही रेल्वे बसला साधारण अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेली. मृतांमध्ये पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने उपचारासाठी कुमिल्ला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.























































