जोतिबा डोंगरावर हुल्लडबाज आणि पुजारी यांच्यात जोरदार हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोतिबा डोंगरावर काही तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे दख्खनचा राजा श्रीजोतिबा मंदिरात पुजारी आणि त्या हुल्लडबाजांमध्ये काल रविवारी दुपारी जोरदार राडा झाला. त्यांनंतर भाविकांसह पुजाऱ्यांनी या हुल्लडबाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. चूक लक्षात येताच जेष्ठ ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त करून, वादावर पडदा टाकला. पण मारहाणीचे चित्रिकरण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागल्याने चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान पुजाऱ्यांनी मारहाण केल्याचे एकतर्फी वृत्त सोशल मीडिया वरून जोरदार व्हायरल झाल्याने, या घटनेच्या निषेधार्थ आज जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद पाळण्यात आला. तर परिते गावातील काही तरुणांनी काळभैरव मंदिरातील पुजारी यांना नारळाची वाटी गुलालात घालुन फेकून मारल्यानंतर शाब्दिक वाद होवुन, ही हाणामारी झाल्याचे समजते. या प्रकरणी कोडोली पोलिसांकडून 30 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येत्या दि.१ एप्रिल रोजी जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रा होत आहे.तयारीची जोरदार लगबग सुरू असुन,मानाच्या सासनकाठी दाखल होण्यास सुरुवात होत आहे.काल रविवारी श्रीजोतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परिते ग्रामस्थही वाजंत्रीसह सासनकाठी घेऊन दुपारी डोंगरावर दाखल झाले होते. याचवेळी यातील काही हुल्लडबाजांनी पुजा-यांशी छेडछाड करण्यासह देवाच्या आरतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. देवस्थान समितीच्या कार्यालयात घुसून,साहित्य विस्कटले.तसेच कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केले. हुल्लडबाज हे नशेत असल्याचे निदर्शनास येताच पुजा-यांचाही संयम सुटला.संबंधित हुल्लडबाजांना पकडून चोप देण्यास सुरुवात झाली.त्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.खरा प्रकार समोर येताच, परिते गावातील काही जेष्ठ ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडला.

दरम्यान पोलीस प्रशासनाकडून याची दखल घेऊन, कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,जोतिबा मंदिर परिसरात सासनकाठी नाचवत असतांना,परिते गावातील काही तरुणांनी काळभैरव मंदिरातील पुजारी यांना नारळाची वाटी गुलालात घालुन फेकुन मारली.त्यावरून शाब्दिक वाद होवुन,पुजारी आणि त्यांच्यात हाणामारी झाली‌. जोतिबा मंदिर परीसरात सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला व गोंधळ घालुन आपसात मारामारी केल्याने,तेथे देव दर्शनास आलेल्या भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने सरकार तर्फे कायदेशिर तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये विजय उर्फ मनोज पाटील,संतोष चंद्रकांत पाटील,अजित आकाराम पाटील,अनिकेत शिवाजी वारकर,सुहास पोपट डोंगळे,दिग्विजय गणपत पाटील,दशरथ महिपती पाटील,संदिप संभाजी भाटवाडे. सोहम शरद मेटे,संमर्थ बळवंत पाखर्णीकर,विशाल भोपाल चौगुले,संजय जगन्नाथ चौगले यांच्या सह तीन ते चार सर्व रा.परिते,ता.राधानगरी) तसेच गणेश गुरव,सुचित चिखलकर (दोघे रा.वाडीरत्नागिरी, ता.पन्हाळा) आणि त्यांच्या सोबतचे १० ते १५ पुजारी (नावे माहित नाहीत), यांचा गुन्हा दाखल झालेल्या मध्ये समावेश आहे.

काल सकाळी आठ पासून दुपारी एक दीड वाजेपर्यंत हा निंदनीय प्रकार घडला असून,परीते गावातील ग्रामस्थ पुर्ण नशेत धुंद होऊन आले होते.त्यांनी देवस्थानातील कर्मचाऱ्यांसह पुजारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही नाहक मारहाण केली. महिलांची छेडछाड केली त्याचा जोतिबा डोंगरावरील गुरव समाजाचा अध्यक्ष म्हणून मी या घटनेचा निषेध करत आहे.तसेच या प्रकरणी आज ज्योतिबा डोंगर येथे सर्व व्यवसाय बंद ठेवून, कालच्या घटनेचा कडकडीत निषेध करण्यात आला. – सुनिल सांगळे (गुरव समाज अध्यक्ष)

वाळलेल्या खोबऱ्याच्या तुकड्याने मारहाणीचे प्रकार रोखणे गरजेचे

दख्खनच्या राजा श्रीजोतिबा मंदिरात येणारे भाविक गुलालासह वाळलेल्या खोबऱ्याची मंदिरात मुक्त उधळण करतात. यामध्ये श्रद्धा असली तरी याचा दुरूपयोग काही हुल्लडबाज भाविक करत असतात, यापुर्वी गुलाला सोबत वाळलेल्या खोबऱ्यांची अर्धे-अर्धे वाटी फेकून मारत आसुरी आनंद घेणाऱ्या त्या हुल्लडबाज भाविकांमुळे इतर भाविकासह मंदिरातील पुजारी जखमी होतात. गेल्या काही वर्षापासून वाळलेल्या खोबऱ्याचे तुकडे करण्याचे शासनाने नियम केले.तरीसुद्धा हे तुकडे नाहक फेकून मारले जात आहेत.मंदिरातील पुजा-यांना यातून जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचे प्रकारही दिवसेंदिवस घडत आहेत.काल रविवारी घडलेला प्रकारही यातूनच घडल्याने पुजारी वर्गातून त्याचे संतप्त पडसाद उमटले. या संदर्भात आता प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.