IPL 2026 – राजस्थान रॉयल्समध्ये ‘रियान पर्व’; पण माझ्या मनात तर रविंद्र जडेजा… अश्विन हे काय म्हणाला? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने एका मोठ्या बदलाची घोषणा केली असून, संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये गेल्यामुळे आता संघाची कमान युवा फलंदाज रियान परागकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयावर हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपले मत व्यक्त केले आहे. अश्विनच्या मते, राजस्थान रॉयल्स हा संघ नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेतो. रियान परागकडे आसामच्या घरगुती संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव असल्याने फ्रँचायझीने त्याच्यावर हा मोठा विश्वास दाखवला आहे. कोणताही निर्णय पूर्ण तयारी आणि चर्चेविना घेतला जात नाही, असेही अश्विनने नमूद केले.

अश्विनने पुढे खुलासा केला की, त्यांच्या मनात या पदासाठी रवींद्र जडेजाचे नाव होते. अनुभवी जडेजाला कर्णधार बनवून रियान परागला उपकर्णधार म्हणून तयार केले जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. जडेजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभव कोणत्याही युवा खेळाडूसाठी मोठी शक्ती ठरू शकला असता. मात्र, राजस्थानने भविष्याचा विचार करून परागची पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवड केली आहे. पराग जरी तरुण असला तरी त्याला आयपीएलचा जवळपास दशकभराचा अनुभव आहे, जो संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.

तथापि, कर्णधारपदाची ही वाट रियान परागसाठी सोपी नसेल, असा इशाराही अश्विनने दिला आहे. आयपीएलमधील चढ-उतार आणि मैदानाबाहेरील दबावाचे व्यवस्थापन करणे हे एक मोठे आव्हान असते. अश्विनच्या मते, जर राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तर परागचे काम सोपे होईल. तसेच, संघात रवींद्र जडेजासारखा अनुभवी खेळाडू आणि कुमार संगकारासारखा तज्ज्ञ सपोर्ट स्टाफ पाठीशी असल्याने परागला कठीण प्रसंगात मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळत राहील, अशी आशा अश्विनने व्यक्त केली आहे.