सरकार जे करेल, त्याला साथ देणे, हेच आता ED चे काम उरले आहे – कपिल सिब्बल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या काळात इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (ED) हे इन्फोर्समेंट राहिले नसून एन्डॉर्समेंट डिरेक्टोरेट झाले आहे. सरकार जे करेल, त्याला साथ देणे हेच त्यांचे काम उरले आहे, असे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह येथे पार पडला. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, “सर्वात आधी संजय राऊत, तुमचे अभिनंदन. तुमचे अभिनंदन यासाठी की, तुम्ही जे धैर्य दाखवले आहे, तसे धैर्य दाखवणारे हिंदुस्थानात खूप कमी लोक आहेत जे तुरुंगात गेले आणि त्यांनी ते लिखित स्वरूपात मांडले. जर तुम्ही हे पुस्तक वाचले, तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुरुंगात नक्की काय चालले आहे.”

सिब्बल म्हणाले, “आपले पंतप्रधान वारंवार म्हणतात की, आपल्याला वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडायचे आहे. पण खरी वसाहतवादी मानसिकता तुम्हाला तुरुंगात पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला जमिनीवर झोपावे लागते, एखादा अधिकारी आला की उभे राहावे लागते, ते देतील तेच जेवण खावे लागते. दिल्लीच्या तिहार तुरुंगात तर कधी रात्रच होत नाही, कारण तिथे रात्रभर दिवे चालू असतात. ऑर्थर रोड तुरुंगातही परिस्थिती अशीच असावी. ज्या प्रकारे तुम्ही (संजय राऊत) आणि विशेषतः तुमच्या कुटुंबाने तुम्हाला साथ दिली, त्याबद्दल मी तुमच्या कुटुंबाचे जाहीर अभिनंदन करतो.

ते म्हणाले, “या पुस्तकाचे शीर्षक ‘अनलाईकली पॅराडाईज’ असे आहे. याचा अर्थ असा की, ऑर्थर रोड तुरुंगात १००० लोकांची क्षमता असताना तिथे ४००० लोक कोंडलेले आहेत. तिथे पेन हे एक शस्त्र मानले जाते. संजय राऊत यांना रोजचे अनुभव लिहिण्यासाठी पेन हवे होते, तेव्हा त्यांना ते दिले जात नव्हते. खूप प्रयत्नांनंतर त्यांना पेन मिळाले. लिहिण्यासाठी टेबल नसल्यामुळे त्यांनी कार्डबोर्डचा आधार घेऊन रात्रीच्या वेळी हे लेखन केले. ही तुरुंगातील परिस्थिती आहे. तुम्ही कोणाशी थेट बोलू शकत नाही, नातेवाईक भेटायला आले तर त्यांना समोरासमोर पाहू शकत नाही. ही कोणत्या प्रकारची वसाहतवादी मानसिकता संपवण्याची भाषा तुम्ही भाषणांमधून करता? वास्तव तर हे आहे की, आपल्याला हे सरकार संपवण्याची गरज आहे.”

कपिल सिब्बल पुढे म्हणाले की, “या पुस्तकाच्या १२३ व्या पानावर एक अत्यंत रंजक माहिती दिली आहे. ईडीच्या कारवाईत अडकलेले विरोधक, काँग्रेसचे २४, टीएमसीचे १९, राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे ८, डीएमकेचे ६ आणि इतर पक्षांचे अनेक नेते. म्हणजे हिंदुस्थानात एकही सरकारी माणूस दोषी नाही, सर्व दोषी फक्त विरोधी पक्षातच आहेत, हे आश्चर्यच आहे. मी केजरीवाल आणि उपस्थित सर्व राजकीय पक्षांना सांगेन की, सर्वांनी एकत्र येऊन कलम ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात एक संयुक्त याचिका दाखल केली पाहिजे. जोपर्यंत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन बोलणार नाहीत, तोपर्यंत यात सुधारणा होणार नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण पीएमएलए (PMLA) कायद्यावरील पुनर्विचार याचिका दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, ती कोणीही ऐकायला तयार नाही.”