
आसामच्या राजकारणातील एक दिग्गज नाव आणि लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी आता राज्याच्या राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे. आगामी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी गौरव गोगोई यांनी जोरहाट मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या या निर्णयामुळे आसाममधील लढत आता हाय-प्रोफाइल आणि अत्यंत चुरशीची झाली आहे.
गौरव गोगोई हे आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई यांचे सुपुत्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली होती, मात्र आता त्यांनी राज्याच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गौरव गोगोई यांनी जोरहाटच्या रस्त्यांवर भव्य रॅली काढली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. “जोरहाट हा केवळ एक मतदारसंघ नसून माझ्या कुटुंबाचे आणि माझे भावनिक नाते आहे. आसामच्या प्रगतीसाठी आणि लोकांच्या हक्कासाठी मी विधानसभेत आवाज उठवण्यासाठी सज्ज आहे, असे यावेळी ते म्हणाले.


























































