
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी मोठी कारवाई करीत दहशतवाद्यांचा कट उधळून लावला. विशेष मोहिमेंतर्गत सुरक्षा दलांनी एकूण 15 दहशतवाद्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त केला. अटक केलेले दहशतवादी हे बंदी घातलेल्या ‘यूएनएलएफ'(कोइरेंग) गटाचे सदस्य असल्याची माहिती पुढे आली आहे. हे दहशतवादी मोठ्या हल्ल्याचा कट रचण्याच्या तयारीत होते, असे बोलले जात आहे.
दहशतवाद्यांकडून स्फोटकांसह रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या कारवाईने दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांमार्फत मणिपूरमध्ये विशेष मोहिम राबवली जात आहे. विविध जिल्ह्यांतील संवेदनशील भागांत सुरक्षा दलांनी विशेष वाॅच ठेवला आहे. राज्यातील एकूण 113 चेकनाक्यांवर संशयितांची झडती घेण्यात येत आहे. तसेच संभाव्य कट-कारस्थाने उलथवून लावण्यासाठी सुरक्षा दलांकडून खडा पहारा देण्यात आला आहे.



























































