आगी विझवण्यापेक्षा अग्निशमन दलाला इमारतींच्या एनओसी देण्यामध्ये स्वारस्य, सुनील प्रभू यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आता प्रत्येक दोन किमी अंतरावर अग्निशमन केंद्र उभारत आहोत. पण आगी लागल्यावर अग्निशमन दलाचे बंब वेळेत पोहोचत नाहीत. दिंडोशीत एका इमारतीची आग विझवण्यासाठी बंब वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे एका महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे अधिकारी अग्निशमन केंद्र आणि बंब चालवण्यापेक्षा इमारतींचे एनओसी प्रमाणपत्र आणि बाकी इतर गोष्टींमध्ये गुंतलेले असतात, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज केला.

विधानसभेत नियम 293च्या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, शाळांना दिलेला अल्पसंख्याक दर्जा, कायदा व सुव्यवस्था, मुंबईतील अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण आणि आगीच्या घटना यावर भाष्य केले.

आगीच्या घटनांबद्दल बोलताना त्यांनी पश्चिम उपनगरातील गोकुळधाममधील लक्षचंडी या इमारतीमध्ये लागलेली आग आणि या आगीत इंदू सिंग या महिलेचा झालेला दुर्दैवी मृत्यू यावरून अग्निशमन दलाला लक्ष्य केले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दल एका तासाने पोहोचल्याचा रहिवाशांचा आरोप असल्याचे सांगितले. मी स्वतः अग्निशमन दलाच्या प्रमुखांना फोन केला. बंब वेळेत पोहोचले असते तर इंदू सिंग यांचा जीव वाचू शकला असता. बंब पोहोचायला का वेळ झाला याची चौकशी व्हावी. विधानसभेत अग्निशमन दलावर विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली.

विमान अपघातामागील सत्य समोर आणा

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा अंतिम अहवाल लवकरात लवकर समोर आणावा. राज्यातील जनतेला अपघातामागील सत्य कळणे गरजेचे आहे.

पोलिसांचा धाक कमी झाला

राज्यात गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री वाढत आहे.  अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत. लहान मुलींची तस्करी होत आहे. पोलिसांचा धाक कमी होत चालला आहे का, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला.