
हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासंदर्भातील फाइल प्रशासकीय दिरंगाईमुळे गेली अनेक वर्षे लटकली आहे. त्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत प्रचंड संतापले. राजगुरूंच्या स्मारकाची फाइल रखडवणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब शहीद करा, अशी मागणी त्यांनी केली.
हुतात्मा राजगुरू यांच्या खेड येथील जन्मगावी स्मारक उभे करण्याचा प्रस्ताव आहे; मात्र स्मारकाची फाइल सातत्याने प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडत आहे. स्मारकाच्या आराखडय़ाबाबतचा अहवाल आज सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी सभागृहात ठेवला तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी या स्मारकाबाबतची वस्तुस्थिती मांडली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर, आधी अहवालात काय लिहिलेय ते पाहूया. त्यानंतर तुम्हाला त्याबाबत सभागृहात म्हणणे मांडता येईल, असे सांगितले.






























































