
रवींद्र जाडेजा आणि यशस्वी जैसवालसारखे दिग्गज खेळाडू असतानाही रियान परागची राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी केलेली नियुक्ती हिंदुस्थानचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांना चांगलीच खटकली आहे. राजस्थानचे व्यवस्थापन परागसोबत जणू ‘राजासारखा’ व्यवहार करतेय आणि हेच सर्वात आश्चर्यकारक वाटतेय, अशी टीका करत त्यांनी परागवर जोरदार हल्ला चढवला आहे.
परागला अतिमहत्त्व
परागचा परफॉर्मन्स सातत्यपूर्ण नसतानाही त्याला कर्णधार बनवणे धक्कादायक आहे. संघात अधिक अनुभवी पर्याय असताना हा निर्णय समजण्यापलीकडचा आहे, असा टोला श्रीकांत यांनी आपल्या एका पॉडकास्टमध्ये लगावला आहे. हे म्हणजे परागला अतिमहत्त्व देण्याचा प्रकारच आहे. राजस्थानमध्ये नुकताच दाखल झालेला रवींद्र जडेजा तसेच यशस्वी जैसवाल आणि ध्रुव जुरेल यांच्यासारख्या खेळाडूंना कर्णधारपदासाठी विचारात का घेतले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
परागची कामगिरी – चमकदार पण अस्थिर
मागील हंगामात परागने 166.52च्या स्ट्राइक रेटने 393 धावा करत दमदार कामगिरी केली होती. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध एका डावात सलग सहा षटकार ठोकत त्याने इतिहास रचला होता. मात्र सातत्याचा अभाव हा त्याच्यावरचा मोठा डाग असल्याचे श्रीकांत यांनी अधोरेखित केले.
राजस्थानची ताकद, पण खोलीचा अभाव
यशस्वी आणि सूर्यवंशीची सलामीची जोडी ही टीमची सर्वात मोठी ताकद आहे. पण चॅम्पियन बनण्यासाठी लागणारे सातत्य आणि खोली राजस्थानमध्ये दिसत नाही. प्लेऑफ गाठणेही निश्चित नाही, असा थेट निष्कर्ष श्रीकांत यांनी काढला.




























































