ठाण्यात क्लस्टर योजनेसाठी महापालिका काढणार कर्जरोखे; ६ हजार २२१ कोटींचे आभासी बजेट सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्मार्ट सिटी’ चा जयघोष करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीची अवस्था बिकट असताना क्लस्टरसह विविध योजना राबवण्यासाठी कर्जरोखे काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ६ हजार २२१ कोटी १२ लाख रुपये एवढा अर्थसंकल्प सादर केला. हे बजेट गेल्या वर्षीपेक्षा दहा टक्क्यांनी फुगवले असून फक्त कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यात आली आहेत. शहरातील महत्त्वाची विकासकामे आता खासगी भागीदारांच्या हाती सोपवावी लागणार असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. कोणतीही करवाढ व दरवाढ ठाणेकरांच्या माथी मारली नसली तरी जुन्या योजनांनाच नवी फोडणी देण्यात आली आहे.

आयुक्त सौरभ राव हे आपल्या पोतडीतून काहीतरी नव्या घोषणा करतील असे वाटले होते. पण प्रत्यक्षात ठाणेकरांचा हिरमोड झाला आहे. पालिकेच्या तिजोरीत सध्या फक्त ८५ कोटी एवढेच पैसे शिल्लक असून आज जाहीर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार आहे. महापालिकेच्या स्वतःच्या उत्पन्नातून २ हजार ३७६ कोटी रुपये या आर्थिक वर्षात मिळणे अपेक्षित आहे. महसुली अनुदानातून १ हजार ८०० कोटी मिळतील असा अंदाज आहे. २ हजार १०० कोटींची देणी बाकी असून योजनांसाठी पैसे आणणार कुठून असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

कर्जरोख्याच्या माध्यमातून ६२ कोटी ४१ लाख रुपये मिळतील असा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. भांडवली, शासकीय अनुदानावरही प्रशासन अवलंबून राहणार असून त्यामाध्यमातून ३३० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारकडून ठाणे पालिकेने यापूर्वीच १५८ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले आहे. क्लस्टर योजना, एसटीपी प्लाण्ट तसेच ३०० किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे बंदिस्तीकरण करण्यासाठी कर्जरोखे काढले जाणार आहेत.
२०२५-२६ मध्ये मालमत्ता कराच्या माध्यमातून महापालिकेला ९२० कोटी रुपये एवढे उत्पन्न अपेक्षित होते. पण डिसेंबर २५ अखेरपर्यंत ५३६ कोटी ३५ लाख रुपये मिळाले आहेत. २०२६-२७ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून १ हजार २०० कोटी रुपये मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या योजनांसाठी तरतूद
आरोग्य सुविधा – २२३ कोटी
पशु शवदाहिनी – १ कोटी ६७ लाख
शहर विकास योजना ४१० कोटी
महिलांसाठी वसतिगृह – ५२ कोटी
धर्मवीर आनंद दिघे टॉवर इमारतीची बांधणी
व ध्यान मंदिर १० कोटी ७१ लाख
बोरिवडे येथे क्रीडा संकुल – ७५ कोटी
कासारवडवली येथे समाजभवन – ११ कोटी
कोलशेत येथे पक्षीगृह – १० कोटी
वाघबीळ येथे नाट्यगृह – १३५ कोटी
टाऊन पार्क – ६९४ कोटी
अॅम्युझमेंट व स्नो पार्क – २६४ कोटी.
३ हजार ३१८ कोटी

महसुली खर्च
२०२६-२७ मध्ये ठाणे महापालिकेच्या वतीने विविध योजना राबवण्यासाठी ३८१८ कोटी १७ लाख रुपये एवढा महसुली खर्च दर्शवला आहे. तर भांडवली खर्च २ हजार ४०१ कोटी ५५ लाख एवढा होईल असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात पाणीपट्टी, घरपट्टी व अन्य करवसुली करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होणार आहे.

आनंद दिघे यांचा विसर
धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाण्यात भव्य स्मारक उभारण्यात येणार होते. दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूदही केली गेली. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या स्मारकाचा उल्लेखही नव्हता. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी आनंद दिघे यांच्या स्मारकासाठी तरतूद करण्यात येईल अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली असून पालिका प्रशासन धर्मवीरांना विसरली आहे.