
धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासामुळे वाढत चाललेले नागरीकरण, एमआयडीसीत विकसित होत असलेले आयटी हब आणि नव्याने सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईतील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा ताण वाढला आहे. परिणामी नागरिकांना प्रत्येक। दिवशी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. याच वाहतूककोंडीतून नवी मुंबईकरांची सुटका करण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गावर तीन उड्डाणपूल आणि पामबीच रोडवर किल्ले गावठाण येथे दुहेरी भुयारी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर अनेक उड्डाणपूल उभे राहिले असले तरी या मार्गावर दररोज मोठी वाहतूककोंडी होते. नवी मुंबईतून मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ऐरोलीमध्ये ताटकळत थांबावे लागते. तुर्भे स्टोअर्स भागातही वाहने मुंगीच्या वेगाने मार्गक्रमण करतात. त्यामुळे या मार्गावर रबाळे, पावणे आणि तुर्भे भागात उड्डाणपूल उभे करण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी आज महासभेत मांडला. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची वाहतूककोंडीतून आता कायमची सुटका होणार आहे.
बेलापूरचा प्रवास होणार सुपरफास्ट नवी मुंबईचा डायमंड नेकलेस म्हणून ओळख असलेला पामबीच मार्ग बेलापूर येथील किल्ले गावठाण चौकाजवळ संपतो. त्या ठिकाणी वाहनचालकांना वाहतूककोंडीत अडकून पडावे लागते. तिथे उड्डाणपूल उभा राहिला असला तरी वाहतूककोंडी कमी झालेली नाही. हा चौक वाहतूककोंडी आणि सिग्नलमुक्त करण्यासाठी तिथे दुहेरी भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा भुयारी मार्ग नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पामबीच मार्गाला समांतर असणार आहे. त्यामुळे बेलापूरकडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
- नवी मुंबई विमानतळावरून सध्या देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. दररोज जवळपास शंभरच्या आसपास विमानांचे टेकऑफ आणि लौंडंग होत आहे. त्यामुळे नवी मुंबईत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे.
- एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात आयटी हब उभे राहत आहेत. परिणामी सध्या उपलब्ध असलेल्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर आणखी तीन उड्डाणपूल उभे राहिल्यानंतर वाहनचालकांना नवी मुंबईतून ठाणे विनासिग्नल गाठता येणार आहे.
- नव्याने तयार करण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांची उभारणी हायब्रीड अॅन्युलिटी मॉडेल या आर्थिक पद्धतीने करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. या पद्धतीत पालिका ३० टक्के रक्कम ठेकेदाराला बांधकाम कालावधीत देणार असून ७० टक्के रक्कम ठेकेदारामार्फत उभारण्यात येणार आहे.
























































