
रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या परताव्याच्या नियमांमध्ये आणि बोर्डिंग स्टेशन बदलण्याच्या प्रक्रियेत मोठे फेरबदल केले आहेत. हे नवीन नियम आजपासूनच लागू करण्यात आले असून, प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यापूर्वी हे बदल नीट समजून घेणे आवश्यक आहे.
रिफंडसाठी वेळेनुसार नवीन स्लॅब्स
रेल्वेने आता तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार मिळणाऱ्या परताव्याची वर्गवारी अधिक कडक केली आहे. जर तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी किमान ४८ तास आधी तिकीट रद्द केले, तर प्रति प्रवासी ठराविक कॅन्सलेशन चार्ज कापून उर्वरित रक्कम परत दिली जाईल. ट्रेन सुटण्यापूर्वी १२ ते ४८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास, एकूण भाड्याच्या २५ टक्के रक्कम कापली जाईल. ट्रेन सुटण्यापूर्वी १२ तास ते ४ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास, भाड्याच्या ५० टक्के इतकी मोठी रक्कम कापली जाईल. चार्ट तयार झाल्यानंतर किंवा ट्रेन सुटण्यास ४ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना तिकीट रद्द केल्यास, प्रवाशांना एक रुपयाही परतावा मिळणार नाही.
प्रवाशांना आता आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा अधिक लवचिक करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार, प्रवासी ट्रेन सुटण्यापूर्वी ४ तास आधीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. मात्र एकदा बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर तिकीट रद्द करायचे असल्यास रिफंडचे नियम मूळ प्रवासाच्या अंतराऐवजी नवीन नियमावलीनुसार लागू होतील.
























































