
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. केरळ निवडणूक आयोगाकडून आलेल्या एका पत्रावर भाजपचा शिक्का असल्याचे समोर आल्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी “आता सगळी गुपिते उघड झाली आहेत,” अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.
उत्तर बंगालच्या दौऱ्यावर असताना एका जाहीर सभेत ममता बॅनर्जी यांनी या पत्राचा दाखला देत म्हटले की, “निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, पण आता त्यांच्या पत्रांवर भाजपचा शिक्का दिसत आहे. हे अत्यंत धक्कादायक असून, यावरून निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, हे स्पष्ट होते.” त्या म्हणाल्या की, केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजप लोकशाहीची थट्टा उडवत आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जेव्हा भाजपला पराभवाची भीती वाटते, तेव्हा ते ईडी, सीबीआय आणि आता निवडणूक आयोगाचा वापर करत आहेत. पण बंगालची जनता हे खपवून घेणार नाही.”



























































