वणवे लावणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होणारी कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात पूर्वी संध्याकाळी घराच्या बाहेर पडल्यावर ससे, खारी, तितर असे विविध पशुपक्षी नजरेस पडत होते; पण आता जंगलात लावण्यात येणाऱया वणव्यांमुळे पशुपक्षी दिसेनासे झाले आहेत, अशी खंत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत व्यक्त केली. त्यावर वणवे लावणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होईल अशी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

वन विभागावरील चर्चेला गणेश नाईक उत्तर देत होते. त्यावेळी भास्कर जाधव यांनी कोकणात वणव्यांच्या घटना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आपण स्वतः जंगलाच्या रस्त्यातून जाताना कसे वणव्यामध्ये अडकलो होतो आणि जंगलातल्या झाडांवरील घरटय़ांमधील अंडी व पिल्ले वाचवण्यासाठी पक्षी कसे वणव्याकडे झेपावत स्वतःची आहुती देत होते याची आठवण सांगितली याची गंभीर दखल घेत वनमंत्री नाईक यांनी वणवे लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.