
>> प्रभाकर पवार
अघोरी विद्येचा वापर करून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व त्यांना देशोधडीला लावणाऱ्या अशोक एकनाथ खरात ऊर्फ कॅप्टन (वय वर्षे अंदाजे ६५. राहणार ३७, तृप्तबाला, कर्मयोगीनगर, नाशिक) या माणसाच्या रूपातील क्रूर नराधमाला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली तेव्हा त्याचे धाडसी कारनामे, दुष्यकृत्ये ऐकून सारा महाराष्ट्र हादरून गेला आहे. ज्याने आपल्या बंगल्याचे नावच ‘तृप्तबाला’ असे उघडपणे ठेवले आहे, त्याला धाडसी म्हणावे नाहीतर काय? तृप्त म्हणजे समाधानी! तृप्त झालेली स्त्री!
अशोक खरात हा कधीही आणि कुठेही कॅप्टन नव्हता. १० वी नापास असलेला हा नीच, दुष्ट, अधम माणूस जहाजावर खलाशी होता, परंतु अंकशाखाचे त्याला अफाट ज्ञान आहे. त्याचा फायदा घेऊन त्याने शेकडो महिलांना, विद्यार्थिनींना नासवले. आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणींचे आयुष्य बरबाद केले, अनेक घरे फोडली. कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त केली. जादूटोणा व अघोरी तंत्रमंत्र विद्येच्या जोरावर त्याने महिलांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. तृप्तबाला’ या बंगल्यात महिलांना संमोहित करून, पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तो त्यांचे शील भ्रष्ट करायचा. नकली प्लॅस्टिकचा नाग असली असल्याचा भासवायचा. आपली समस्या घेऊन गेलेल्या महिलांना हा पापी ‘तुझ्या नवऱ्याला मी ठार मारीन, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. गुंडही आहेत,’ अशी धमकी द्यायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा.
लग्न जुळत नाही म्हणून या दुष्टाकडे गेलेल्या तरुणींचे लग्न जुळल्यानंतर तो त्या मुलींच्या नियोजित नवऱ्याला ‘मुलगी चालू आहे, तिच्याशी लग्न करू नकोस’ असा सल्ला देऊन तो लग्न मोडायचा. मुलीलाही तुझा नवरा बाहेरख्याली असल्याचे सांगून त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा, घटस्फोट घ्यायला लावायचा, परंतु या नराधमाचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सर्व सत्ताधारी, राजकीय नेते, पुढारी खिशात असल्याने या चारित्र्यहीन माणसाने कधी परिणामाची पर्वाच केली नाही. केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री त्याला भेटतात, काही त्याच्या चरणाशी येतात, लोटांगण घालतात म्हटल्यावर खरातसारखा हृदयशून्य माणूस कशाला कुणाची पर्वा करेल? उलट त्याने मंत्री, आयएएस आदी अधिकाऱ्यांच्या मदतीने आपल्या नावावर नाशिक जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची मालमत्ता उभारली आहे. अशोक खरात या नराधमाच्या कार्यालयात अल्प पगारात (महिना ८ हजार) १०-१२ तास काम करणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुण कर्मचाऱ्याचे स्टेटमेंट धक्कादायक आहे. ते वाचले की, अशोक खरातला भरचौकात चाबकाने फोडले पाहिजे, फाशी दिली पाहिजे असे वाटते.
सरकारवाडा पोलिसांना आपल्या कबुली जबाबात हा तरुण म्हणतो, “अशोक खरात याच्या (ओकास प्रॉपर्टी, कॅनडा कॉर्नर, नाशिक) कार्यालयात मी २०१९ पासून काम करीत होतो. कार्यालयाची साफसफाई, फोन अटेंड करणे आदी कामांसोबत अशोक खरात याच्याकडे येणाऱ्या क्लाएंटच्या बोटांचे अंगठीसाठी मापही घ्यायचो. अशोक खरात हे आपल्या क्लाएंटला वेगवेगळ्या रंगांचे खडे पंचधातूच्या अंगठीमध्ये घालण्यासाठी द्यायचा व त्यांच्याकडून हजारो रुपये उकळायचा. वास्तविक हे सर्व खडे व अंगठ्या बनावट असायच्या हे माझ्या लक्षात यायचे, परंतु अशोकबाबाकडे बड्या बड्या नेत्यांची, व्हीआयपींची रोज होत असलेली गर्दी पाहून मीही गोंधळून जायचो. कधी कधी माझे एक मन बाबाकडे खरोखर अचाट दैवी शक्ती आहे असे सांगायचे, तर कधी हा बोगस भोंदूबाबा असल्याचे दुसरे मन सांगायचे.”
असायचे, परंतु बाबा पतीला किंवा त्यांच्या नातेवाईकांना केबिनबाहेर बसवायचे व एकट्या महिलेला आपल्या केबिनमध्ये घ्यायचे. त्यानंतर काही वेळाने, तासाने बाहेर आलेल्या बऱ्याच स्त्रिया थकलेल्या व अस्वस्थ वाटायच्या. मी विवाहबद्ध आहे हे बाबाला माहीत असल्यामुळे एक दिवस त्याने माझ्या पत्नीला आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याकडे घेऊन ये असे फर्मावले.” असे सांगताना तो तरुण पुढे म्हणतो, “मी बाबाला म्हणालो, माझी बायको सात महिन्यांची गरोदर आहे. ती येणार नाही.” तेव्हा बाबा म्हणाला, ‘मग तर तिला घेऊनच ये. तुला जर चांगली संतती हवी असेल तर माझ्या आशीर्वादाची तिला गरज आहे, नाहीतर तिच्यावर दुष्ट शक्तींचा असर होईल.’ अशी भीती दाखवून बाबा पुढे म्हणाला, “ती सुखरूप बाळंत होईल आणि तिला ठणठणीत मुलगाच होईल याची हमी देतो, असेही बाबाने सांगितले.”
पोलिसांना जबाब देताना तो तरुण पुढे म्हणतो, परंतु माझा घात झाला. बायकोला मी बाबाकडे नेले तेव्हा त्याने मलाही केबिनबाहेर थांबविले. काही वेळाने माझी पत्नी बाहेर आली तेव्हा ती रडायला लागली. बाबाला शिवीगाळ करू लागली. अशोक खरात या नराधमाने ती गरोदर असतानाही तिला ठार मारण्याची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्याच वेळी मी शपथ घेतली की बाबाला संपवायचे! तो काय काय घृणास्पद कृत्ये करतो हे जगासमोर आणायचे. मी नोकरी सोडली नाही. मी एक छुपा कॅमेरा (Spike कॅमेरा) बाबाच्या केबिनमध्ये बसविला. ज्या ज्या महिला त्याच्याकडे जायच्या त्यांचे तो भीती दाखवून लैंगिक शोषण करायचा हे मी पाहिले. असे ५० च्या वर व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असेही त्या तरुणाने सरकारवाडा पोलिसांना हा तरुण पुढे म्हणतो, “बाबाकडे रोज महिलांची गर्दी असायची. त्यांचे पती किंवा कुटुंबीयही सोबत आपल्या लेखी जबाबात सांगितले आहे.
अशोक खरातकडे नोकरी करणाऱ्या तरुणाच्या पत्नीचे खरातने तो तरुण उपस्थित असताना पडद्याआडून बंद खोलीत लैंगिक शोषण केले हे जरी खरे असले तरी तो तरुणही पैशांच्या मोहात पडला होता. अशोक खरातच्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या इतर पीडित महिलांना आपल्याकडे तुमचे अश्लील फोटो असल्याचे सांगून व त्यांना ते पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. सरकारवाडा पोलिसांनी त्या तरुणालाही अटक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाण्यासाठी नाशिक पोलिसांसह आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अशोक खरातचा भंडाफोड झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडे अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. नैसर्गिक-अनैसर्गिक सेक्ससाठी अशोक खरातने आपणास कसे छळले याची कर्मकहाणी त्या सांगत आहेत, परंतु महिलांवरील अत्याचाराची सर्वात प्रथम बातमी गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात ‘खबरदार पुढारी’ या वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी आपल्या वृत्तपत्रात छापली होती, परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात या भोंदूबाबाविरुद्ध बातमी छापणाऱ्या दत्तात्रय खेमनार यांना पाच कोटींचा अबूनुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रथम धमकी दिली. त्यानंतर खेमनार यांना माफी मागावयास भाग पाडले. यावरून अशोक खरात या लंपटाला राज्यकर्त्यांचाच कसा उघड पाठिंबा होता हे उघड होते. असो. खेमनार या धाडसी पत्रकाराचे अभिनंदन। उशिरा का होईना महिलांना न्याय मिळाला.
गुजरातच्या आसाराम बापू व पंजाबच्या गुरमीत रामरहीम सिंग या भोंदूबाबांना महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, परंतु हे नराधम आज जामिनावर बाहेर येऊन गेल्या वर्षभरापासून मजा मारत आहेत. अशोक खरातचे तसे होऊ नये ही अपेक्षा। नाशिकचे धडाडीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अशोक खरात या ज्योतिषाची भररस्त्यातून वरात काढून भोंदूबाबांना इशारा दिला आहे, हेही नसे थोडके। एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते या राज्य पोलीस दलाचे प्रमुख सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली अशोक खरातच्या दुष्कृत्यांचा तपास करीत आहेत. सदानंद दाते हे अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी आहेत. राजकीय हस्तक्षेपाला ते भीक घालणारे नाहीत. त्यामुळे भोंदूबाबा ही जमात भविष्यात नक्कीच संपुष्टात येईल. त्यांच्या अघोरी विद्येला मूठमाती मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे


























































