मारहाणीनंतर ट्रकचालकांनी सावळेश्वर टोलनाका फोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यावरील कामगारांनी ट्रकचालकाला मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या ट्रकचालकांनी टोलनाका फोडला. यात अनेक टोल बूथचे नुकसान झाले असून, टोलनाक्यावरील कर्मचारी फरार झाले आहेत. यामुळे पुणे-महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.

सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यावरील कर्मचारी टोल घेताना ट्रकचालकांना शिवीगाळ व मारहाण करत होते. आजही टोलनाक्यावरील काही कर्मचाऱ्यांनी एका ट्रकचालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना टोलनाक्यावरील अन्य ट्रकचालकांनी पाहिली. त्यानंतर संतप्त झालेल्या ट्रकचालकांनी टोलनाक्यावर हल्ला केला. प्रारंभी कर्मचाऱयांनी शिवीगाळ करत विरोध केला. मात्र, संतप्त ट्रकचालकांनी मिळेल ते साहित्य घेऊन टोलवरील बूथ फोडण्यास सुरुवात केली. यात टोलनाक्यावरील अनेक बूथ फोडण्यात आले. यावेळी ट्रकचालकांचा संताप पाहून टोलवरील कर्मचारी फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत ट्रकचालकांना आटोक्यात आणले. या घटनेने सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.