
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वनव्यामध्ये शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. आगीचे स्वरूप इतके रौद्र आहे की, परिसरातील जैवविविधतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या भागात ही आग लागली आहे, तिथेच काही दिवसांपूर्वी रेडिओ कॉलर लावून एका वाघिणीला सोडण्यात आले होते, त्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत असून, दुरूनही या आगीचे तांडव दिसून येत आहे. या आगीत केवळ झाडे-झुडपेच नव्हे, तर जमिनीवरील असंख्य सरपटणारे प्राणी, कीटक आणि पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली आहेत. वाऱयाच्या वेगामुळे आग पसरत असल्याने ती विझवणे कठीण झाले आहे.
वनव्याची माहिती मिळताच वन विभागाची ‘फायर टीम’ घटनास्थळी पोहोचली असली, तरी आग आटोक्यात आणण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. आगीचा आवाका पाहता वन विभागाची सज्जता आणि साधनसामग्री ‘कुचकामी’ ठरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अत्याधुनिक उपकरणांचा अभाव आणि नियोजनातील त्रुटींमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचे बोलले जात आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा अतिसंरक्षित क्षेत्रात येतो. येथे विनापरवाना प्रवेशास सक्त मनाई असतानाही, इतकी मोठी आग लागलीच कशी? हा प्रश्न निसर्गप्रेमी आणि स्थानिकांना पडला आहे. ही आग नैसर्गिक आहे की कोणीतरी जाणीवपूर्वक लावली आहे, याबद्दल आता संशय व्यक्त केला जात आहे.
व्याघ्र प्रकल्पासारख्या संवेदनशील क्षेत्रात आग लागणे ही गंभीर बाब आहे. त्यातच वाघिणीचा अधिवास असलेल्या क्षेत्रात ही घटना घडल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
– मनीषा पाटील, उपसभापती, शिराळा पंचायत समिती































































