
प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी एका विवाहीत तरुणाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मृत महिलेच्या वडिलांच्या संशयामुळे आणि पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे दीड वर्षांनंतर या हत्येचा पर्दाफाश झाला आहे.
ही घटना १४ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. ३४ वर्षीय नारंगी ऊर्फ गीता चौधरी ही महिला तिच्या राहत्या घरी स्वयंपाकघरातील छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. सुरुवातीला घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे मानले आणि ‘अपघाती मृत्यू’ची (ADR) नोंद केली. पहिल्या शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र गीताचे वडील भानाराम चौधरी यांना आपल्या मुलीने आत्महत्या केली असेल यावर विश्वास नव्हता. त्यांनी राजस्थानमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आणि प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी लावून धरली. त्यांच्या दबावानंतर, गीताचा दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या दुसऱ्या अहवालात गीताचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आणि हत्येचे गुपित उघड झाले.
महिलेचा पती साकाराम याने यापूर्वीही दोनदा गीताला मारण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही वेळा अपयश आल्यानंतर साकारामने त्याचा मित्र शंकर डांगी याला तिच्या हत्येची सुपारी दिली. शंकरने या कामात मदतीसाठी बाबू ऊर्फ राघव आणि दिनेश या दोघांना सोबत घेतले. १४ ऑक्टोबर रोजी या आरोपींनी गीताची गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पंख्याला लटकवून दिला. साकाराम याचे डिंपल चौधरी नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. साकरामला डिंपलसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा कट रचला.
पोलिसांनी सुरुवातीला साकरामची उलटतपासणी केली तेव्हा त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणी पोलिसांनी पती साकाराम, सुपारी घेणारा शंकर डांगी आणि त्याचे दोन साथीदार बाबू आणि दिनेश अशा चौघांना अटक केली आहे.

























































