Sangameshwar News – बेपत्ता तरुणाचा मृतदेह बावनदीच्या पात्रात आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर नजीकच्या उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. दीपक शांताराम गोणबरे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीपक गोणबरे हा घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. या प्रकरणी बेपत्ता तरुणाची पत्नी दिक्षा हिने 22 मार्च 2026 रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर 24 मार्च रोजी सायंकाळी करबुडे येथील बावनदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह तरंकताना आढळला. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या दीपक गोणबरे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अब्दुल मुनाफ खतीब, रवींद्र जाधव, अनिल जाधव, माजी सरपंच मिलिंद खानविलकर, करबुडे गावचे पोलीस पाटील हरीश वेदरे तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता या प्रकरणाची नोंद बी.एन.एस.एस. कलम 194 अन्वये केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.