Iran US Israel War – मध्यस्थीच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानला इराणने लायकी दाखवली; कराचीला जाणारे जहाज होर्मुझच्या वेशीवरूनच हाकलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वत:च्या देशामध्ये इंधनाचा ठणठणाट असताना आणि अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात मध्यस्थी करायला निघालेल्या पाकिस्तानला इराणने लायकी दाखवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी विना परवानगी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानली जहाजाला रोखत इराणने माघारी पाठवले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह बंदरातून कराचीच्या दिशेने जाणाऱ्या सेलेन हे जहाज इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स सैनिकांनी होर्मुझच्या वेशीवरूनच परत धाडले आहे.

‘सेलेन’ नावाचे हे जहाज 23 मार्च रोजी शारजाहच्या बंदराहून पाकिस्तानच्या कराची बंदराकडे निघाले होते. हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पोहोचताच इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने त्याची वाट अडवली. इराणचा सज्जड दम मिळताच या जहाजाला मुकाट्याने आपला मार्ग बदलावा लागला आणि ते पुन्हा आखाती देशांच्या दिशेने मार्गस्थ झाले.

कायदेशीर नियमांचे पालन न केल्यामुळे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी नसल्यामुळे ‘सेलेन’ या जहाजाला माघारी पाठवण्यात आले. या जलमार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला इराणच्या सागरी प्राधिकरणाशी पूर्ण समन्वय राखणे अनिवार्य आहे, असे IRGC नौदलाचे कमांडर अलीरेझा तांगसिरी यांनी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या युद्धामुळे इराणने जगाला पर्शियन आखाताशी जोडणारी होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. परंतु इराणने हा मार्गच बंद केल्यामुळे सध्या टँकरची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. जे देश ‘शत्रू’ नाहीत, ते इराणशी पूर्वसंवाद साधून आपला मार्ग मोकळा करू शकतात. मात्र, शत्रू राष्ट्रांशी संबंधित जहाजांना प्रवेश नाकारला जाईल, असे इराणने आधीच स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानचा मध्यस्थीचा प्रयत्न

मध्य पूर्वेतील हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी म्हणून भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यास यतार असल्याचे म्हटले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही शरीफ यांचे हे विधान आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले होते.

Iran US Israel War – फक्त 40 दिवसांचा इंधन साठा शिल्लक, ‘या’ देशात राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी लागू, हिंदुस्थानमधील परिस्थिती काय?