
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उत्तर प्रदेश सरकारने रिंकू सिंगची ‘प्रादेशिक क्रीडा अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी ही घोषणा केली. लखनौ येथील लोकभवन येथे बुधवारी आयोजित एका विशेष सोहळ्यात रिंकू सिंहला हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘मेडल लाओ, पद पाओ’ या विशेष मोहिमेअंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. रिंकू सिंग खऱ्या अर्थाने 2013 च्या आयपीएल हंगामात प्रसिद्धीच्या झोतात आला होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात यश दयालच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून त्याने कोलकाता नाईट रायडर्सला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून त्याने हिंदुस्थानी संघासाठी ‘फिनिशर’ची भूमिका यशस्वीपणे बजावली आहे.
मैदानाबाहेरील या यशासोबतच रिंकूवर आयपीएलमध्येही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी आयपीएल 2026 च्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रिंकू सिंगची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. तो अनुभवी अजिंक्य रहाणेचा डेप्युटी म्हणून काम पाहील. यापूर्वी व्यंकटेश अय्यरकडे ही जबाबदारी होती, मात्र लिलावात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात सामील झाल्याने केकेआरने रिंकूवर विश्वास टाकला आहे. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी मंगळवारी कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली.
वैयक्तिक आयुष्यात रिंकूसाठी हा काळ संघर्षाचा आणि धैर्याचा राहिला आहे. टी-20 विश्वचषक सुरू असतानाच त्याच्या वडिलांचे, खानचंद यांचे कर्करोगाने निधन झाले होते. या दुःखातून सावरत आणि सर्व अंत्यविधी पार पाडल्यानंतर तो पुन्हा संघात सामील झाला, जी एक प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.






























































