
भोंदूगिरी, जादूटोणा आणि महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला अशोक खरात याच्याबाबत दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक राजकारण्यांसोबत संबंध असलेला हा भोंदूबाबा त्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता असा खळबळजनक आरोप माहिती अधिकार अभियानाचे नेते विजय कुंभार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबईतक या वाहिनीशी बोलताना विजय कुंभार यांनी खरातबाबत हा दावा केला आहे. पुढे या विषयी बोलताना रुपाली चाकणकर यांना देखील अटक झाली पाहिजे असे म्हटले आहे. ”या प्रकरणाची चाकणकर यांना आधीच माहिती होती. तरिही त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यांच्याकडे वर्षभरापूर्वी खरात विरोधात तक्रार आली होती. तिथे त्यांनी खरातवर कारवाई करण्याऐवजी बातमी प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र काढले होते. त्या खरातच्या वागण्याचे उदात्तीकरण करत होत्या. याचा अर्थ त्यांनी या बाबाच्या गुन्ह्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन त्यांच्या या गुन्ह्यात त्या सामील होत्या. त्यामुळे त्यांना अटक झालीच पाहिजे”, असे कुंभार यांनी सांगितले. महिला आयोग व रुपाली चाकणकर खरातला का पाठीशी घालत होता? असा सवाल देखील कुंभार यांनी उपस्थित केला.

























































