अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं; फडणवीसांच्या खुर्चीला सुरूंग लावण्याचा प्रयत्न काही जण करत होते! – जितेंद्र आव्हाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अशोक खरात प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उमटवले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनसनाटी दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीवरून हटवण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अशोक खरातकडे जाऊन पूजाविधी केले. यावेळी अशोक खरात यानेही थोडे दिवस द्या, फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दिसणार नाही, असे आश्वासन दिले होते, असा दावा आव्हाड यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरूंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजूला बसणाऱ्यांनी केला. त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार तिथे रांग लावून बसले होते. फडणवीस यांनाही हे सगळे माहिती आहे, असे आव्हाड म्हणाले. अशोक खरातकडे पूजा घालण्यासाठी कोण गेले, कुणी बैठका घेतल्या ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांपूर्वी मिळाली होती. 38 आमदारांची यादी असून अशोक खरातकडे जाऊन त्यांनी बोट कापले, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

अशोक खरात याने पहिला खून 2007 मध्ये बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. त्यावेळी नाशिकमध्ये याची चर्चा झाली, पण कुणी गांभीर्याने घेतले नाही. एका वृत्तपत्रामध्ये यावर दहा लेख छापून आले. त्यामुळे महाराष्ट्राला, पोलिसांना, पत्रकारांना खरात माहिती नव्हता अशातचा भाग नाही. हे इंटेलिजेन्सचे अपयश असून खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना द्यायला हवी होती. तसेच आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे फक्त देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. चांगले चांगले अधिकारी खरातपुढे लोटांगण घालायचे, त्याला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये घेतले, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, मी अत्यंत खात्रीने सांगतो की, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरूंग लावण्याचा प्रयत्न काही जण करत होते. अशोक खरातकडे पूजा घालण्यासाठी गेले होते. वेळ आल्यावर त्यांची नावे उघड करेन. ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांपूर्वी मिळाली होती. अशा प्रकारच्या जादूला राजमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, तिथे सरकारी पैशातून कमानी, टाक्या बांधल्या जात असतील… असा खरात कोण मोठा लागून गेला? तुकारामांच्या, ज्ञानेश्वरांच्या, शिवरायांच्या महाराष्ट्रात काळ्या जादूला इतकी राजमान्यता देऊ लागलो याचे मला वाईट वाटते. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते असे समस्त आमदारांना वाटू लागले असून 38 आमदारांनी खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या. याची यादीही आपल्याकडे आहे, असे आव्हाड म्हणाले.

अशोक खरात याच्या ट्रस्टमधील सदस्यांना अजून अटक का झाली नाही? असा सवालही आव्हाड यांनी केला. खरातच्या ट्रस्टमध्ये पैसा कुठून आला? कुणी कुणी कुठे कुठे जमिनी घेऊन द्या? हे महाराष्ट्राला कळायला हवे. त्याला वाचवण्यासाठई बडे अधिकारी दोन-दोन कोटी घेणार असतील तर त्यांचा काय करायचे? ज्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांचे काय करायचे? ट्रस्टमधील लोकांचे काय करायचे? त्यांनाही सहआरोपी करा, अशी मागणी आव्हाड यांनी केली. तसेच जेफ्री एपस्टीनप्रमाणे अशोक खरात यांचे काही होऊ नये म्हणून 24 तास कॅमेऱ्याद्वारे त्यांच्यावर नजर ठेवा अशी मागणीही आव्हाड यांनी केली.