
आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत पारदर्शकता असावी, अशी मागणी करत समाजवादी पक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, याची सविस्तर माहिती संसदेला द्यावी,” अशी मागणी सपा खासदार रामगोपाल यादव यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना रामगोपाल यादव म्हणाले की, देशाचे परराष्ट्र धोरण हे केवळ नेतृत्वाकडून, म्हणजेच पंतप्रधानांकडून ठरवले जात आहे. सध्याच्या जागतिक संकटात पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की यांसारखे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते म्हणाले, “हिंदुस्थान ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदुस्थानने मध्यस्थीची भूमिका बजावायला हवी होती. पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याशी जे काही संभाषण केले, त्याबाबत संसदेला विश्वासात घेणे गरजेचे आहे.”
यावेळी त्यांनी गुजरातमध्ये लागू करण्यात येत असलेल्या समान नागरी कायद्याच्या (UCC) मुद्द्यावरूनही भाजपवर टीका केली. जिथे भाजपची सत्ता आहे, तिथे ते जनहिताच्या विरोधात असलेले कायदे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

























































