
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या जेटीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. बांधकामादरम्यान ८ ते १० पिलर चिखलात खचले असून, भरावालाही भेगा पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कामाची तत्काळ चौकशी आणि ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (संरचनात्मक लेखापरीक्षण) करण्याची मागणी साखरीनाटे मच्छीमार सहकारी सोसायटी व स्थानिक मच्छीमारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नेमका प्रकार काय? साखरीनाटे येथे मासेमारी व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होते. ही गरज ओळखून शासनाने सुमारे १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, गेल्या काही महिन्यांपासून जेटीचे काम वेगाने सुरू आहे. सध्या धाऊलवल्ली येथील ‘फेज-१’ आणि साखरीनाटे येथील ‘फेज-२’ चे काम सुरू आहे. मात्र, ‘फेज-१’ मधील पिलर उभारणीच्या सुरुवातीलाच ८ ते १० पिलर चिखलात खचले आहेत. तसेच सुरुवातीला टाकलेल्या भरावालाही अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत.
मच्छीमारांची सुरक्षिततेबाबत भीती साखरीनाटे जेटी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मासे उतरवण्यासाठी आणि अवजड सामान चढवण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असणार आहे. जेटीचे पिलर आत्ताच खचत असतील, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे साखरीनाटे मच्छीमार सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी मच्छीमार नेते अमजद बोरकर, मलीक गडकरी, शफी वाडकर, सादत हबीब, बांगी, नदीम तमके, तन्वीर भाटकर, शोएब म्हसकर, फैय्याज नळेकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधव उपस्थित होते.
“शासनाचा १५३ कोटींचा निधी खर्च होत असताना कामाचा दर्जा असा असेल, तर ते भविष्यात धोकादायक ठरेल. या कामाची सखोल चौकशी झाल्याशिवाय काम पुढे नेऊ नये.” — मच्छीमार प्रतिनिधी, साखरीनाटे.





























































