
पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या वेळापत्रकाचा बट्टय़ाबोळ उडाला असून प्रवास आणखी जीवघेणा झाला आहे. या मार्गावर दररोज 15 ते 20 गाडय़ा रद्द तसेच बहुतांश गाड्या अर्धा तास उशिराने धावत असल्याने लोकल गाडय़ांना खचाखच गर्दी होत आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा 82 टक्क्यांपर्यंत ढासळला आहे.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली, विरार आणि डहाणूपर्यंत दररोज एकूण 1414 फेऱया चालवल्या जात आहेत. यात 133 एसी लोकल ट्रेनचा समावेश आहे. रेल्वे प्रशासन वेळापत्रकात नॉन-एसी (साध्या) लोकलच्या जागी एसी लोकल फेऱयांचे नियोजन करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे आधीच हाल होत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम’चा प्रतिकूल परिणाम लोकल वाहतुकीवर झाला आहे.
बोरिवली येथे जानेवारीमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम’ कार्यान्वित केली होती. त्यानुसार सिग्नल यंत्रणेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र त्याऐवजी लोकल ट्रेन्सना वेळीच योग्य तो सिग्नल मिळत नसल्याचे सूत्रांकडून समजते. मार्गावर एखाद्या गाडीला सिग्नलमुळे रखडावे लागले की त्यामागून धावणाऱया सर्वच गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडत आहे. परिणामी, सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज 15 ते 20 लोकल फेऱया रद्द केल्या जात आहेत. तसेच बहुतांश गाड्या 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. पूर्वी पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा दर 98 टक्के होता. तो सध्या 82 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हा कोलमडलेला वक्तशीरपणा पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा करण्याचे काम गांभीर्याने हाती घेतले गेले आहे. यासंदर्भात सातत्याने उच्चस्तरीय बैठका होत आहे, असे रेल्वे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
मोटरमन, गार्ड्सच्या डय़ुटीवर परिणाम
लोकल ट्रेन शेवटच्या स्थानकात पोहचण्यास 25 ते 30 मिनिटांचा विलंब होत आहे. अशा स्थितीत मोटरमन, गार्ड्सना चहा-नाश्ता करणे तसेच विश्रांती घेण्यास खूप कमी वेळ मिळत आहे. लोकल सेवेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा डय़ुटीवर परिणाम होत असल्याची नाराजी मोटरमन-गार्ड्सकडून व्यक्त केली जात आहे.
दिवसेंदिवस सामान्य प्रवाशांच्या गैरसोयीत भर
एसी लोकल ट्रेनची संख्या वाढवल्यापासून सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेकदा लागोपाठ एसी ट्रेन सोडल्या जातात. त्यानंतर येणाऱया साध्या ट्रेनमध्ये शिरणे मुश्कील बनते. त्यामुळे स्थानकातच अर्धा ते एक तास वाया जाते. दिवसेंदिवस लोकल प्रवास जीवघेणा बनत आहे, असे बोरिवली येथील सागर कोयंडे यांनी सांगितले.



























































