बिबटे आता अंगणात येऊ लागलेत, वन विभाग काय करतोय? नाना पटोले यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भात बिबटय़ांचा वावर वाढला असून ते आता थेट घराच्या अंगणात येऊ लागलेत, त्यांना आरण्यासाठी वन विभाग काय करतोय, असा सवाल काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला.

अभयारण्य परिसरात वाघाने माणसांवर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत असून साकोली येथे एका 50 वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. मृत व्यक्तीच्या पश्चात चार मुले, विधवा आई आणि पत्नी असा संपूर्ण कुटुंबीयांचा आधार हरपला आहे. म्हणूनच या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. जे वाघ पूर्वी केवळ जंगलात दिसत होते ते आता थेट गावांमध्ये आणि घरांच्या अंगणातही दिसू लागले आहेत. जंगलातील चाऱयाअभावी डुक्कर, हरीण, सांबर यांसारखे प्राणीही शेतजमिनींकडे वळत आहेत, त्यामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे पटोले म्हणाले. त्याला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही दिली.