Jalna News – इंधन तुटवड्याचा गाजावाजा.! जालन्यातील भोकरदनमध्ये तपासणीत हजारो लिटर साठा उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात व भोकरदन शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध पेट्रोल पंपांवर बुधवारी 25 मार्च रात्रीपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून आली. या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली असून वाहनधारकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही पंपांवर ‘साठा शिल्लक’ असल्याचे सांगत गुरुवारी सकाळी नावापुरती विक्री सुरू करण्यात आली. मात्र गर्दी अनियंत्रित होत असल्याचे लक्षात येताच अनेक पंपचालकांनी अचानक ‘नो स्टॉक’चे फलक लावून पेट्रोल व डिझेल संपल्याचे जाहीर केले. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत तहसील प्रशासनाने दुपारी अचानक तपासणी मोहीम राबवली. तहसीलदार झानेश्वर काकडे, पुरवठा निरीक्षक नाईक व त्यांच्या पथकाने भोकरदन शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील तब्बल 28 पेट्रोल पंपांची तपासणी केली. या तपासणीत दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास संबंधित पंपांवर 91,148 लिटर पेट्रोल व 63,712 लिटर डिझेल साठा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तपासणीनंतरही काही पंपचालकांनी उपलब्ध साठा नागरिकांना वितरित न करता विक्री बंद ठेवल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘नो स्टॉक’चा बनाव करून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा संशय अधिक बळावला आहे. हा साठा नेमका कशासाठी राखून ठेवण्यात आला आहे, याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सध्या शेती मशागतीची कामे वेगात सुरू असल्याने डिझेलची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत पंपचालकांकडून होत असलेली ही कथित दडपशाही शेतकरी व सर्वसामान्यांसाठी मोठा अडथळा ठरत आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी
करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सर्व पंपांवर नियमित तपासणी करून पारदर्शक विक्री सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.