
सध्या सुरू असलेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका एलपीजी वितरण एजंटने सुमारे 30 घरगुती गॅस सिलिंडर घेऊन फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या विझाग शहरात सध्या स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून सिलिंडरसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. इराण – इस्रायल संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी अप्पा राव या वितरण एजंटने ग्राहकांकडून ओटीपी आणि रिकामे सिलिंडर गोळा केले. काही दिवसांत भरलेले सिलिंडर देतो, असे आश्वासन त्याने दिले. मात्र, महिनाभर उलटूनही ग्राहकांना सिलिंडर मिळाले नाहीत, त्यानंतर हा प्रकार उघड झाला.
गॅस एजन्सीकडून तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाने तत्काळ कारवाई सुरू केली. महसूल अधिकाऱ्यांनी सुमारे 20 ग्राहकांना पर्यायी सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आणि गायब झालेले सिलिंडर शोधण्यासाठी तपास सुरू आहे.




























































