
‘मराठी चित्रपटांचे माहेरघर’ असलेले लालबागमधील भारतमाता सिनेमागृह नूतनीकरणानंतर नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मात्र या सिनेमागृहाच्या उद्घाटनालाच ‘धुरंधर-2’ या हिंदी चित्रपटाचा शो लावल्यामुळे मराठी सिनेप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. भारतमातावरील मराठी ठसा पुसण्याचा डाव शिवसेनेने हाणून पाडला आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर सिनेमागृहाचे व्यवस्थापन ताळय़ावर आले असून उद्या, गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ‘सुपर डुपर’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो ठेवण्यात आला आहे.
गिरणगावातील भारतमाता सिनेमागृहात आजवर अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यांनी इतिहास रचला. अनेक दिग्गज कलाकारांची कारकीर्द भारतमाता सिनेमागृहामुळे बहरली. नूतनीकरणासाठी सहा वर्षे बंद असलेले हे सिनेमागृह 24 मार्चपासून पुन्हा एकदा खुले झाले. या सिनेमागृहात उद्घाटनालाच हिंदी चित्रपटाचा शो दाखविल्यामुळे तसेच सिनेमागृहामध्ये नोकरी देताना स्थानिक भूमिपुत्रांना डावल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये नाराजी होती.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखा क्र. 203 च्या वतीने भारतमाता सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाची नुकतीच भेट घेतली. या सिनेमागृहामध्ये यापुढे फक्त मराठी चित्रपटांना प्राधान्य द्यावे तसेच स्थानिक मराठी तरुणांना तत्काळ नोकरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नगरसेविका भारती पेडणेकर, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, उपशाखाप्रमुख अमित सातर्डेकर, प्रदीप वाटाणे आदी उपस्थित होते.
स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळणार
शिवसेनेच्या दणक्यानंतर भारतमाता सिनेमागृहाच्या व्यवस्थापन ताळय़ावर आले असून उद्या ‘सुपर डुपर’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो ठेवण्यात आला आहे. या शोसाठी शिवसेना नेते–खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, नगरसेविका भारती पेडणेकर व शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याची शिवसेनेची मागणीदेखील व्यवस्थापनाने मान्य केली आहे.

























































