
साहित्यसेवक वसंत तावडे हे अजब रसायन होते. त्यांच्या प्रत्येक कामात आग्रह, शिस्त, चौकट होती. मेहनत करणे हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यांनी मराठी साहित्याची सेवा मनोभावे केली. प्रबोधन संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी वसंत तावडे यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रबोधन गोरेगावकर आणि साप्ताहिक ‘मार्मिक’तर्फे आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन मार्मिक कथा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुभाष देसाई बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे, साप्ताहिक ‘मार्मिक’चे संपादक मुकेश माचकर, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विनोदी लेखक सॅबी परेरा, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे, सल्लागार प्रा. बापू नाडकर्णी, संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे, कोषाध्यक्ष रमेश इस्वलकर आदी उपस्थित होते.
या वेळी इतिहासाचे अभ्यासक, लेखक-वत्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी शिवचरित्र या विषयावर विशेष व्याख्यान सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमांचकारी जीवनपट उलगडला. या वेळी डॉ. क्षमा शेलार यांच्या ‘धुपं’ कथेला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना 15 हजार रुपये आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक प्रभाकर मठपती यांच्या ‘शेकडा पाच’ या कथेला, तर तृतीय क्रमांक विनय खंडागळे यांच्या ‘टिचल्या बांगडय़ांचं घर’ या कथेला मिळाला. योगिनी पाळंदे (कथा – ‘नवीन नाते’), प्रसाद खानोलकर (कथा – ‘दुतोंडी अजगर’), डॉ. मोनाली हर्षे (कथा – ‘अट्टाहास’ ) यांना उत्तेजनार्थ तसेच विनोदी कथेत प्राजक्ता आपटे यांच्या ‘नाटक’ कथेला विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्पर्धेसाठी प्रबोधन गोरेगावचे गोविंद गावडे आणि सल्लागार सदस्य विजय नाडकर्णी यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचे परीक्षण सॅबी परेरा, विनोद पितळे, विजय नाडकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता थोरात यांनी केले. या वेळी तावडे कुटुंब आणि गोरेगावकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

























































