
पश्चिम रेल्वे मार्गावरील मीरा रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 2वरील एस्केलेटर (सरकता जिना) अखेर दुरुस्त झाला आहे. हा सरकता जिना चार दिवसांपासून बंद होता. याबाबत दै. ‘सामना’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने सरकत्या जिन्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच मीरा रोड स्थानकात नवीन एस्केलेटर बसवण्यात आला. मात्र पुढील काही दिवसांतच एस्केलेटरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड उद्भवू लागला. मागील चार दिवसांपासून एस्केलेटर पूर्णपणे बंद होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच जड सामान घेऊन चाललेल्या प्रवाशांना तीव्र उन्हात पायऱयांचा वापर करावा लागत होता. अनेक वृद्ध प्रवाशांना काठीच्या आधाराने जिने चढताना मोठी कसरत करावी लागत होती. उन्हाच्या तडाख्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. या पार्श्वभूमीवर दै. ‘सामना’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर तातडीने एस्केलेटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि प्रवाशांची गैरसोय दूर झाली.


























































