मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; मुंब्यात बेछूट गोळीबार, एक ठार, तिघे गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानलेल्या बहिणीची वारंवार छेड काढणाऱ्या त्रिकुटावर एका इसमाने आज भरदुपारी बेछूट गोळीबार केला. या घटनेत एकजण ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जयन शिवानंद नायर असे आरोपीचे नाव असून मुंब्रा पोलिसांनी त्याला शस्त्रासह अटक केली आहे. या घटनेमुळे मुंब्याच्या बिस्मिल्ला चाळीत प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.

अन्नू शेख ही महिला मुंब्याच्या कैलासनगरातील बिस्मिल्ला चाळीत राहते. याच चाळीत जयन नायर (५१) हा राहतो. त्याने अन्नू शेख हिला बहीण मानले आहे. याच परिसरात राहणारे अब्दुल शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख हे नेहमी तिची छेड काढत असल्याचा आरोप अन्नू शेख हिने केला. तिने ही बाब जयन नायर याला सांगितली. जयन नायर याने या तिघांना गाठून जाब विचारला. त्यातून वाद पेटला. त्यावेळी जयन याने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून बेछूठ गोळीबार केला. या घटनेत अकबर अब्दुल शेख हा जागीच ठार झाला तर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख यांच्यासह अन्य आणखी एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला. जखमींवर काळसेकर रुग्णालयात तातडीचे उपचार सुरू आहेत. गोळीबार केल्यानंतर फरार झालेल्या जयन नायर याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ठाण्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
ठाण्यात अलीकडच्या काळात गोळीबाराच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. ७ मार्च रोजी मुंब्रा येथील कौसा भागात एका कारवर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पकडत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेनेही पाच गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये दोनजण जखमी झाले होते. तर २६ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नौपाडा परिसरातील सर्व्हिस रोडवर गोळीबार करून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.