संस्कृतायन – हृदयी प्रीत जागते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समिरा गुजर जोशी, [email protected]

अतिशय मोजक्या प्राचीन आणि भारतीय प्रेमकथा आपल्याला ज्ञात आहेत, त्यातील अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय म्हणजे नलदमयंती यांची. महाभारतातील नलोपाख्यानातवन पर्वातील बावन्नाव्या अध्यायात आलेली ही कथा नैषधीय चरितात अगदी विस्ताराने रंगवली आहे. नलदमयंतीच्या विवाहापर्यंतचा कथा भाग असलेले हे काव्य प्रामुख्याने शृंगाररसप्रधान आहे. महाभारतात अवघ्या 186 श्लोकात आलेला कथा भाग त्याने 2804 श्लोकात विस्ताराने सांगितला आहे.

आपण काव्य कोणासाठी लिहित आहोत, आजच्या भाषेत सांगायचे तर आपला टार्गेट वाचक कोण आहे याचे भान प्रत्येक लेखकाला असते, पण तो त्याचा उच्चार करेलच असे नाही. नैषधीय चरित लिहिणाऱया श्री हर्षाने मात्र आपल्या काव्याच्या शेवटी धीटपणे असे म्हटले आहे की, तरुणी तरुणाचेच अंतकरण खेचून घेते. लहान मुलांना तिच्या विषयी आकर्षण कसे वाटावे? माझी वाणीही खऱया प्रगल्भ पंडित रसिकांचे मनोरंजन करणारी आहे. बालिश अरसिकांना तिचे सौंदर्य कसे कळणार? थोडे पंडित माझ्यावर खूश असले म्हणजे झालं. मग असंख्य अडाणी माझा अनादर केला तरी मला त्याची पर्वा नाही.

हे सांगण्यात त्याचा आत्मविश्वास प्रकट होतोच आहे, पण किंचित मिश्कीलपणासुद्धा उठून दिसतो आहे. ही विनोद बुद्धी हा त्याच्या शैलीचा एक दुर्मिळ विशेष म्हटला पाहिजे. आपण आपले काव्य पंडितासाठीच लिहीत आहोत हे त्याने ठरवले आहे. त्यामुळे रचनेत ती प्रौढता नक्की जाणवते. नैषधम् विद्वत औषधम् – नैषधीय चरितम् हे विद्वानांचे बुद्धिवर्धक औषध किंवा टॉनिक आहे असा सुविचार प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हे काव्य आजच्या वाचकाला पहिल्या वाचनात कदाचित पटकन कळत नाही, पण एकदा का त्याच्या शैलीची उकल झाली की, मात्र आनंदाचा झरा सापडतो.

मुळात या काव्याची कथा मराठी साहित्यात अतिशय लोकप्रिय आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या ‘हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता’ या गीतात जी नल-दमयंतीची कथा आहे तीच या काव्याचा मूळ विषय आहे. ज्यात प्रेमाचे निरोप पोहोचवण्याचे काम करणारा राजहंस आहे.

खरे तर अतिशय मोजक्या प्राचीन आणि भारतीय प्रेमकथा आपल्याला ज्ञात आहेत. महाभारतात नलोपाख्यानात ती येते. वन पर्वातील बावन्नाव्या अध्यायात युधिष्ठिर बृहदश्व ऋषींना विचारतो की, त्याच्यापेक्षा जास्त दुःख भोगलेला कोणी आहे का? युधिष्ठिर म्हणतो, तुम्ही माझ्यापेक्षा अधिक दुर्दैवी राजा कधी पाहिला आहे किंवा ऐकला आहे का? मला खात्री आहे की, एवढे दुःख भोगलेला कोणीही नसेल. प्रत्युत्तर म्हणून बृहदश्व ऋषी नलराजाची कथा सांगतात आणि म्हणतात की, नल राजाने स्वत युधिष्ठिरापेक्षाही जास्त दुःख भोगले आहे.

या महाकाव्यात मात्र नल-दमयंतीच्या विवाहापर्यंतचा कथा भागच येतो. त्यामुळे प्रामुख्याने हे काव्य शृंगाररसप्रधान आहे. नल-दमयंतीच्या या कथेचा आपला परिचय आहे तो रघुनाथ पंडित यांनी लिहिलेल्या नल-दमयंती स्वयंवर आख्यानामुळे. त्यातील

म्हातारी उडता न ये ची तिजला माता मदीया अशी

कांता काय वदू नवप्रसवती साता दिसांची तशी

पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजित असे 

हाता माजी नृपा तुझ्या गवसलो आता करावे कसे!’’

यासारखे श्लोक अनेकांना तोंडपाठ आहेत. ते काव्यही या महाकाव्यावर आधारित आहे. त्यामुळे कथा भाग वेगळा सांगत नाही, पण काही सौंदर्यस्थळे नक्की पाहू या. जशी की ही रचना… तो राजहंस दमयंतीला भेटला आहे. तो तिला स्वतच्या दैवी गुणांचे वर्णन करतो आहे. तो म्हणतो, तू फक्त तुझी इच्छा सांग. मी ती पूर्ण करतो. तू म्हणालीस तर मी लंकेलाही जाईन. त्यावर दमयंती म्हणते, माझे मन लंकेला जाऊ इच्छित नाही. चेतो न लंकामयते। पण हेच शब्द नीट वाचले तर तिच्या मनात काय नाही त्याप्रमाणे काय आहे हेही सांगितले आहे – चेतो ‘नलम्’ कामयते। विरहाने व्याकूळ झालेल्या दमयंतीला चक्कर येते तेव्हा वैद्य म्हणतात, स्यादस्या नलदं विना न दलने तापस्य केपि क्षम। हिला नलदाची म्हणजे वाळ्याची उटी लावली पाहिजे. मराठीतील ‘औषध मजला नलगे’ हे उदाहरण याच प्रकारचे आहे, पण या शाब्दिक खेळाबरोबर कथानकात काही अतिशय रंजक प्रसंग त्याने निर्माण केले आहेत.

मुळात महाभारतात अवघ्या 186 श्लोकात आलेला कथा भाग त्याने 2804 श्लोकात विस्ताराने सांगितला आहे, पण त्याचे वैशिष्टय़ म्हणजे प्रेमात पडलेल्या व्यक्तींचे मानसिक व्यापार कसे असतात हे सांगण्यावर त्याचा भर आहे. हंसाचे पात्र तर त्याने फार सुरेख रेखाटले आहेच, पण नल राजासारखा प्रियकर रेखाटण्यात त्याचे खरे कौशल्य दिसते. नायकासमोर संकट किंवा संघर्ष उभा केल्याशिवाय काव्य रंगतदार कसे होणार? यासाठी त्याने ज्या प्रसंगाची कल्पना केली आहे तो रोमहर्षक असा आहे, त्याविषयी पुढील लेखात जाणून घेऊ.

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृतमराठी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत.)