
गुड फ्रायडेनिमित्त सकाळी प्रार्थनेसाठी गेलेल्या भाविकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याचा प्रकार वसई पश्चिमेच्या रानशेत गावातील दया माता चर्च परिसरात घडला आहे. या हल्ल्यात एका मुलीसह आठ जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुड फ्रायडेनिमित्त आज सकाळी नऊच्या सुमारास ख्रिस्ती बांधव रानशेत येथील दया माता चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आले होते. प्रार्थना झाल्यानंतर चर्चमधून बाहेर पडत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलीवर हल्ला केला. तिला वाचविण्यासाठी दोन नागरिक धावत गेले असता त्यांचाही चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याने अन्य पाच जणांवर हल्ला करून त्यांचे लचके तोडले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे चर्चच्या परिसरात एकच पळापळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसई-विरार महापालिकेचे श्वान पथकाने तातडीने घटनास्थळी आले आणि या पथकाने त्यांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद केले. कुत्र्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींना महापालिकेच्या डी. एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वच भाविकांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


























































