
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
[email protected]
कथाकार, निबंधकार, समीक्षक, इंग्रजीच्या प्राध्यापक अशी ओळख असणाऱया लेखिका कुसुमावती देशपांडे ज्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. तरल कविवृत्ती असलेल्या या लेखिकेचे बंडखोर विचार आजही स्त्री-साहित्यात महत्त्वाचे ठरतात.
1920 ते 1940 या काळात एक अत्यंत महत्त्वाचं नाव स्त्रियांच्या साहित्यावकाशात चमकत होतं ते म्हणजे विदुषी कुसुमावती देशपांडे यांचं. कथाकार, निबंधकार, समीक्षक, इंग्रजीच्या प्राध्यापक! बंडखोर विचारांच्या तर त्या होत्याच. पण त्या बंडखोरीला जोड होती शिस्तशीर अभ्यासाची आणि शालीन वावराची. त्या काळात त्यांचा आणि कवी अनिल यांचा आंतरजातीय विवाह झाला. पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांचा पत्रव्यवहार नंतर ‘कुसुमानिल’ या नावाने प्रसिद्धही झाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ज्या निवडक मोजक्या स्त्रिया अध्यक्ष झाल्या त्यातल्या या पहिल्या! 1961 मध्ये ग्वाल्हेर इथं झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. साहित्य संमेलनाची परंपरा सुरू झाल्यावर, तब्बल 83 वर्षांनी प्रथमच एका स्त्राrला हा मान मिळाला. त्या काळी स्वागत मंडळाचे सभासद संमेलनाचा अध्यक्ष निवडत असत. ग्वाल्हेरच्या स्वागत मंडळाने एकमुखाने कुसुमावतींचे नाव सुचवलं. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली, असंच म्हणायला हवं. गंमत म्हणजे ‘पहिल्या स्त्राr अध्यक्ष’ म्हणून होणारे कौतुक त्यांना मुळीच मानवत नसे. “मध्ययुगीन स्त्राrदाक्षिण्याचे का हे दिवस आहेत?’’ असं त्या काहीशा नाराजीने म्हणत असत.
असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या कुसुमावतींनी 1926 साली नागपूर विश्वविद्यालयातून बी.ए. ही पदवी सुवर्णपदकासह प्रथम क्रमांकाने संपादन केली. लगेचच सरकारची खास शिष्यवृत्ती मिळवून त्या इंग्लंडला गेल्या. 1929 मध्ये लंडन विद्यापीठाची बी. ए. ऑनर्स ही पदवी त्यांनी प्राप्त केली. याच वर्षी कवी अनिल यांचाशी त्यांचा विवाह झाला. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात 1932 ते 1956 या काळात त्यांनी इंग्रजीच्या अध्यापनाचं काम केलं. त्यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा प्रारंभ कथालेखनापासून झाला.
नवकथापूर्व काळातली वैशिष्टय़पूर्ण कथा लिहिणारी लेखिका म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. ‘दीपदान’, ‘दीपकळी’, ‘मोळी’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्या काळी (1935 च्या आसपास) रूढ झालेला लघुकथेचा साचेबद्धपणा मोडून काढणारी, व्यक्तिमनातील आंदोलने टिपणारी, चिंतनशील, संयत आणि रेखीव कथा त्यांनी लिहिली. त्यांची कथा लहानशा अनुभवाला काव्यात्म चिंतनशीलतेचं परिमाण देत व्यापक मानवतेला आवाहन करणारी आहे. त्या काळात रूढ झालेली व्याज काव्यात्मता, रंजनवाद आणि कृत्रिम बोधवाद यांना टाळून सोपी, पण कसदार कथा त्यांनी लिहिली. ‘कला आणि कृत्रिमता’ या निबंधात त्या म्हणतात, “कलाकाराला जर एखाद्या गोष्टीची प्रचीती आली असेल तर त्याला ती गोष्ट सांगण्यासाठी कृत्रिम प्रयत्न करावे लागतच नाहीत. त्याच्या अनुभवाच्या कसदारपणामुळे त्याची कलाकृती आपोआपच आकर्षक बनते. म्हणूनच साधेपणा , सरळपणा व साधनसामग्रीचा अतिशय कमी उपयोग हे श्रेष्ठ कलाकृतीचे नेहमीचे विशेष होत.’’
‘चंद्रास्त’, ‘माध्यान्ह’, ‘मध्यरात्र’ या ललितलेखसंग्रहातून त्यांच्या तरल कविवृत्तीचा आणि प्रौढ चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो. कुसुमावातींच्या निर्मितीला अनेक वाटा होत्या. त्यांनी ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ या रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्राचा इंग्रजीत अनुवाद केला असून मर्मज्ञ समीक्षालेखनही केले आहे. ‘पासंग’ आणि ‘मराठी कादंबरी पहिले शतक’ या ग्रंथांमधून त्यांच्या विवेचक समीक्षादृष्टीची, व्यासंगाची आणि मानवतावादी दृष्टिकोनाची प्रचीती येते. त्यांच्या या समीक्षालेखनातून आधुनिक मराठी साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि नवी जाण मिळाली.
‘कुसुमावती वाङ्मयदर्शन’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत अनुराधा पोतदार लिहितात, “काही एका सामाजिक कल्याणातच कलेचे अंतिम श्रेयस असते हा कलाविषयक दृष्टिकोन कुसुमावतींनी सदैव मनोमन बाळगला होता. त्यामुळे त्यांच्या सर्वच लेखनामागील दृष्टी ही वाङ्मयाचे उद्दिष्ट काय आणि हे उद्दिष्ट व जीवनहेतू यांचे परस्परनाते काय यासंबंधी त्यांनी विचारांती मनात धरलेल्या दृढ भूमिकेशीच निगडित आहे…अशी जीवननिष्ठा असणाऱया व्यक्तीच्या ठायी जी गाढ समाजाभिमुखता असते तोच कुसुमावतींच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव होता.’’
ऑक्टोबर 1961 मध्ये त्या संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या आणि एकाएकी नोव्हेंबर 1961 मध्ये त्या दिवंगत झाल्या. त्यांच्या अकाली निधनाने मराठी समीक्षेचं आणि एकूणच साहित्यव्यवहाराचं खरोखर मोठं नुकसान झालं.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)




























































