
>> डॉ. मीनाक्षी पाटील
[email protected]
आनंदवर्धनाने काव्यातील चैतन्यतत्त्वाला, सूचक अर्थाला महत्त्व देत काव्याला ध्वन्यर्थाकडे वळविले. एखाद्या शब्दाच्या उच्चारानंतर अधिकचा अर्थ व्यक्त करणाऱया या ध्वन्यर्थ लहरींचे दर्शन ज्ञानेश्वर माऊलींनीही केले. काव्य किंवा नाटय़ातून अर्थापलीकडचा अर्थ, तत्त्वापलीकडचे परतत्त्व कसे व्यक्त होते याचा बोध ज्ञानेश्वरीतून होतो.
कोणताही कलावंत त्याला येणाऱया विविध प्रकारच्या जीवनानुभवांतूनच कळत नकळत प्रेरणा घेत असतो आणि त्याच जीवनानुभवांचे दृश्य-अदृश्य ताणेबाणे त्याच्या कलाकृतीतून आकारत असतात. प्रत्येक कलेतील माध्यमद्रव्याच्या विशिष्टेतेमुळे प्रत्यक्ष कलाकृतीतही तसा वेगळेपणा अनुभवाला येतो. ललित साहित्यात जीवनाच्या चैतन्याचे दर्शन घडते. याच कारणास्तव भाषा या माध्यमाद्वारे, साधनेद्वारे केलेली जीवनानुभवाची नावीन्यपूर्ण अशी चैतन्यपूर्ण रचना म्हणजे साहित्यनिर्मिती असे म्हटले जाते. कलावंत कलानिर्मितीत आधार म्हणून जरी जीवनानुभवांचा आशयद्रव्य म्हणून वापर करीत असला तरी त्याआधारे तो एका कल्पित विश्वाची निर्मिती करत असतो. त्यामुळे कलाकृतीत जाणवणारे चैतन्य हे प्रत्यक्ष जीवनातील चैतन्यापेक्षा वेगळे असते. या अर्थाने कोणत्याही कलाकृतीतून एक आभासी चैतन्यानुभव प्रकटतो. कलाप्रकारानुसार वेगवेगळ्या माध्यमद्रव्य व आशयद्रव्य यांच्या माध्यमातून कलावंताची कलाकृती आकारत असते. या लेखात आपण साहित्यकलेतील ‘काव्य’ या वाङ्मयप्रकारातील दृश्य-अदृश्याचा खेळ कसा आकारतो याविषयी चर्चा करणार आहोत.
कविता म्हणजे शब्द, शब्दबंध व वाक्यबंध यांच्या वैशिष्टय़पूर्ण अशा क्रमबद्ध नादलयीत प्रकट झालेला प्रतिभाविष्कार. कवी त्याच्या मनातल्या भावना जेव्हा शब्दबद्ध करतो त्यावेळी त्याला ते शब्दबंध प्रचलित भाषेत काही ‘तयार’ स्वरूपात आयते उपलब्ध होत नाहीत, तर त्याला ते निर्माण करावे लागतात. बऱयाचदा कवी आपल्या कवितेत दैनंदिन व्यवहारातलेच शब्द जरी वापरत असला तरी त्यांचे उपयोजन तो असे काही वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने करतो की त्या शब्दांचे दैनंदिन जगण्यातील रूढार्थ गळून पडतात आणि कवितेतून वेगळाच असा सूचक अर्थ झळाळतो. कवीच्या भावानुभव प्रकटीकरणात वैशिष्टय़पूर्ण अशा रूपबंधांचा वापर असतो. रूपबंध म्हणजे रचनाबंध, आकृतिबंध किंवा घाट. कोणत्याही भावानुभवाला आकार प्राप्त झाल्याशिवाय तो अनुभूतीचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे कवी भावानुभवाच्या प्रकटीकरणाला रूप देऊ पाहतो.
ध्वनिबंध, प्रतिमा, प्रतीके, रूपके, नादबंध, छंद, शब्दालंकार, अर्थालंकार इ. इ. असे अर्थाचे सूचकत्व प्रकट करणाऱया विविध घटकांचा कवितेमध्ये समावेश होतो. भारतीय साहित्यशास्त्रात आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्तापूर्वी अलंकार, गुण, रीति, वक्रोक्ति, वृत्ति असा फक्त काव्यशरीराचाच विचार प्राधान्याने झाला. परंतु आनंदवर्धनाने मात्र काव्यातील चैतन्यतत्त्वाला, प्रतियमान, सूचक अर्थाला महत्त्व देऊन त्याच्यापूर्वी मांडण्यात आलेल्या रस, अलंकार, रीति व गुण यांना ध्वनिसिद्धान्तात सामावून घेण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट केले. अशा रीतीने त्याने काव्याला अलंकारादि गोष्टींपलीकडील रसपरिपोषाकडे नेण्यासाठी ध्वन्यर्थाकडे वळविले. शब्दांच्या वाच्यार्थापेक्षा म्हणजे मूळ अर्थापेक्षा काही ‘अधिक’च्या सूचक, ध्वन्यार्थाला, व्यंग्यार्थाला त्याने महत्त्व दिले. या ध्वन्यर्थाचे नेमके उदाहरण आपल्याला अगदी ज्ञानेश्वरीतही पाहायला मिळते. ज्ञानदेवांवर असणाऱया नाथपरंपरेतील काश्मिरी शैव संप्रदायातील प्रभावामुळे आनंदवर्धन, अभिनवगुप्तांच्या ध्वनिसिद्धान्ताचे दर्शन ज्ञानेश्वरीतील काव्यनाटकाच्या वर्णनात आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील सातव्या ओवीत माऊली म्हणतात-
‘देखा काव्य नाटका । जे निर्धारिता सकौतुका
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ।
या सदरातील चौथ्या लेखात आपण ‘अनुरणन’ या संज्ञेचा उल्लेख केला होता. ध्वन्यर्थ म्हणजे काय हे स्पष्ट करताना या आचार्यांनी घंटेच्या अनुरणनाचा दृष्टान्त वापरला आहे. त्यांच्या मते घंटा वाजवल्यावर पहिल्या आघाताच्या नादानंतर एकापाठोपाठ घंटानादाच्या लहरी उत्पन्न होतात, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या शब्दाच्या उच्चारानंतर त्याचा मूळ अर्थ समजल्यानंतर ज्या अधिकचा अर्थव्यक्त करणाऱया अर्थलहरी, अर्थतरंग निर्माण होतात ते म्हणजे ध्वन्यर्थ. अशाप्रकारे ज्ञानेश्वर माऊलींनी काव्य-नाटकातील शब्दांमधून वाच्यार्थ बाधित न होता त्या वाच्यार्थासोबतच ध्वन्यर्थ-सूचक अर्थ कसा निर्माण होतो हे आनंदवर्धनाच्या घंटेच्या रुणझुण म्हणजे अनुरणन या दृष्टान्तातून सांगितले आहे. काव्य किंवा नाटय़ातून अर्थापलीकडचा अर्थ, तत्त्वापलीकडचे परतत्त्व कसे व्यक्त होते याचा विचार ज्ञानेश्वरांच्याही पूर्वी बौद्ध तत्त्वज्ञ, कवी, नाटककार अश्वघोषाने केलेला होता.
भारतीय साहित्य शास्त्रकारांसारखेच पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांनीही वेगळ्या शब्दात साहित्यातून व्यक्त होणाऱया सूचक अर्थाला, ध्वन्यर्थाला, व्यंजनेला, आयरनीला महत्त्व दिले आहे. अगदी रोमन काव्यविचारात ज्या रहस्यमय अनिर्वचनीय तत्त्वाला काव्याचा आत्मा मानले आहे, त्यालाच आनंदवर्धनाने प्रतीयमान पुनरन्यदेव वस्तु असे म्हटले आहे. थोडक्यात काव्यामध्ये वरवरचा अर्थ व्यक्त करणाऱया सरधोपट शब्दांपेक्षा सूचक, अधिक व्यापक किंवा वेगळा असा मार्मिक अर्थ व्यक्त करणाऱया शब्दबंधांना विशेष महत्त्व असते. कवितेतून व्यक्त होणारा अनुभव हा कवीच्या सभोवतालचे वास्तव व त्याची सर्जनशीलता यांच्या परस्परप्रक्रियेतून निर्माण होत असतो, याअर्थाने तो वास्तवातीत असतो.
कवीला वास्तवात अनुभवाला येणाऱया गोष्टींसोबतच समोर प्रत्यक्ष दिसत नसलेल्या तसेच अमूर्त गोष्टीही तितक्याच तीव्रतेने जाणवत असतात. अशा या दृश्य-अदृश्य अनुभवांच्या आधारे कवी आपल्या काव्यातून बाह्य वास्तवाशी मिळतेजुळते असे प्रातिभासिक विश्व निर्माण करीत असतो. या प्रातिभासिक विश्वाच्या नियमांविषयी जाणून घेऊया पुढील लेखात.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)


























































