
इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झालेली असताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झटका बसणार आहे. लवकरच रोजच्या आंघोळीतील साबण, सोडा आणि खायचे तेल महाग होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे आणखी नकोसे होईल. फास्ट मूविंग पंज्यूमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्या आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहित पुन्हा एकदा किमती वाढवण्याच्या तयारीला लागल्या आहेत.
नुवामा इन्स्टिटय़ूशनल इक्विटीजच्या एका अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात कॉस्ट वाढली आहे. यामुळे आता कंपन्यांना किमती स्थिर ठेवणे शक्य होत नाही. जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत तर आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहित कमीत कमी 3 ते 4 टक्क्यांपर्यंत किमती कंपन्यांना वाढवाव्या लागतील. त्याशिवाय कंपन्यांकडे दुसरा पर्याय नाही, असे एका ब्रोकरेज फर्मच्या अहवालात म्हटले आहे. कंपन्यांकडे आधीचा असलेला स्टॉक आता संपत चालला आहे. त्यामुळे नवीन स्टॉक हा महाग असणार आहे. एफएमसीजी कंपन्या आपले प्रोडक्ट्स साबण, बिस्किट, शॅम्पूच्या पॅकेजिंग प्लॅस्टिकने करतात. हे तेलाने बनवले जातात. आता पॅकेजिंगला जास्त खर्च येत आहे. त्यामुळे कंपन्या आपले उत्पादन महाग किमतीत विकू शकतात. याशिवाय कच्चे तेल महाग झाल्याने लॉजिस्टिकवर खर्च अधिक येत आहे. कंटेनरच्या भाड्यापासून जहाजांच्या विम्यापर्यंत सर्वच महाग झाल्याने याचा फटका मालांना बसत आहे.
तेलाला महागाईची उकळी फुटणार
एप्रिल ते जून 2026 पर्यंतच्या 2027 च्या पहिल्या तिमाहित उत्पादनाच्या कमीत कमी 3 ते 4 टक्के किमती वाढतील. सर्वात जास्त परिणाम पेंट, खायचे तेल, साबण, डिटर्जेंट सेक्टरवर होणार आहे. पामतेल आणि पॅकेजिंग मटेरियल महाग झाल्याने याच्या किमती नक्कीच वाढणार आहेत. जागतिक संकटामुळे खाद्यतेलाच्या किमतीत लवकरच वाढ होईल. युद्धामुळे डाबर आणि इमामीसारख्या कंपन्यांची चिंता वाढली आहे. कारण त्याच्या एकूण विक्रीत जवळपास 6 टक्के हिस्सा याच क्षेत्रातून येतो.


























































