
उत्तराखंडमधील प्रसिद्ध नेलांग दरी आता पर्यटकांसाठी वर्षभर खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सीमावर्ती भागात पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्यासोबतच आता लडाखसारखा अनुभव घेण्याची संधी मिळू शकणार आहे. तसेच स्थानिक पर्यटनाला नवी गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक हवामानातील प्रत्येक बदलत्या क्षणासोबत हिवाळ्यात बर्फाच्छादित दृश्यांचा आनंद घेऊ शकतील.
हिंदुस्थान आणि चीन सीमेजवळ असलेली ही दरी अनोख्या नैसर्गिक सौंदर्याचा व शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. अनोख्या भौगोलिक रचनेमुळे हे ठिकाण साहस आणि फोटोग्राफीच्या शौकिनांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरू शकेल. ही दरी वर्षभर खुली ठेवण्याच्या निर्णयामुळे आता या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ वाढण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाने हा निर्णय लागू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि नियम निश्चित केले आहेत. पर्यटकांना निर्धारित प्रक्रियेनुसारच दरीत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. चीन सीमेला लागून असलेल्या या संवेदनशील ठिकाणाचा विचार करता पर्यटकांसाठी पाळत ठेवणे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणेदेखील अनिवार्य असणार आहे. दरीमध्ये प्रवेश केवळ सकाळी निर्धारित वेळेतच दिला जाईल आणि सर्व पर्यटकांना संध्याकाळपर्यंत परत येणे अनिवार्य असेल.
सौंदर्याची खाण
नेलांग दरी ही जणू नैसर्गिक सौंदर्याची खाण आहे. ही दरी बर्फाच्छादित शिखरे, रुंद दऱया आणि स्वच्छ आकाशामुळे एखाद्या परदेशी ठिकाणासारखी अनुभूती देते. येथे ट्रेकिंग, निसर्ग भ्रमंती आणि फोटोग्राफीचा वेगळाच रोमांच अनुभवता येतो. उंचीवर असल्यामुळे येथील हवामान आणि दृश्ये प्रत्येक क्षणी बदलत राहतात, जे पर्यटकांना एक अनोखा अनुभव देतात.
कसे पोहोचाल दरीत
नेलांग घाटीत पोहोचण्यासाठी सर्वात आधी देहरादूनला जावे लागेल. देहरादूनहून रस्तेमार्गाने उत्तरकाशीपर्यंत सहज पोहोचता येते. इथून पुढचा प्रवास डोंगराळ रस्त्यांवरून जातो, जो खूप सुंदरदेखील आहे. उत्तरकाशीहून पुढे भटवाडीमार्गे हर्षिलला पोहोचता येते. हर्षिलपर्यंत खासगी वाहन किंवा टॅक्सीने आरामात प्रवास करता येतो. हर्षिलहून पुढे भैरोंघाटी चेकपोस्ट येते, जिथून नेलांग घाटीचा रस्ता सुरू होतो. इथून पुढे जाण्यासाठी परमिट अनिवार्य आहे आणि परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

























































