राधानगरी अभयारण्यात आले ‘रायबा’ आणि ‘सरदार’, दोन नर वाघांच्या अस्तित्वाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम घाटातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यात अलीकडेच दोन नर वाघांच्या अस्तित्वाची नोंद झाली आहे. नियमित गस्तीदरम्यान, तसेच कॅमेरा ट्रपच्या माध्यमातून ही माहिती समोर आली असून, त्यासंबंधी वन विभागाकडून सखोल पडताळणी करण्यात आली आहे. या दोन्ही वाघांचे ‘रायबा’ व ‘सरदार’ असे नामकरण करण्यात आले आहे.

नियमित गस्तीदरम्यान, तसेच कॅमेरा ट्रपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पुराव्यांवरून ‘एसटीआर-07’ आणि ‘एसटीआर-08’ असे नामांकन असलेले दोन्ही वाघ नर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाकडून या दोन्ही वाघांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांच्या ‘टेरिटरी’चा अर्थात क्षेत्रांचा अभ्यास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार दोन्ही वाघ प्रौढ अवस्थेतील असून, त्यांच्या हालचाली स्वतंत्र क्षेत्रांमध्ये होत असल्याचे दिसून येते.

वन कर्मचाऱयांकडून गस्तीदरम्यान मिळालेल्या पग मार्क्स (पायांचे ठसे), पॅमेरा ट्रप छायाचित्रे, तसेच इतर वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या हालचालींचे मार्ग, पाणवठय़ांचा वापर आणि निवास क्षेत्र यांचे सखोल विश्लेषण सुरू आहे.

सह्याद्रीकोकणमधील महत्त्वाचा दुवा

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वाघांची वाढती संख्या हे व्याघ्र प्रकल्प संवर्धनाचे यश आहे. ‘रायबा’ आणि ‘सरदार’ यांच्यामुळे (टी-7 व टी-8) सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा असल्याचे अधोरेखित होते, असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले.

अतिशय चांगला भ्रमणमार्ग

सावंतवाडी, दोडामार्ग ते राधानगरी अभयारण्य हा भाग वाघांचा अतिशय चांगला भ्रमणमार्ग आहे. पुढे हा भ्रमणमार्ग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. त्यामुळे वाघांचे पुढे उत्तरेकडे स्थलांतर होण्यास मदत होत आहे, असे मानद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.

एकूण नऊ वाघांचे अस्तित्व

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याला जोडणाऱया राधानगरी वन्यजीव अभयारण्यात नोंद झालेले नऊ वाघ ः टी-1 ‘सेनापती’, टी-2 ‘सुभेदार’, टी-3 ‘बाजी’, टी-4 ‘चंदा’, टी-5 ‘तारा’, टी-6 ‘हिरकणी’, टी-7 ‘रायबा’, टी-8 ‘सरदार’, टी-9 ‘शिलेदार.’