
देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान सर्वात जास्त अटीतटीची लढत पश्चिम बंगालमध्ये पहायला मिळत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. यादरम्यान मुर्शिदाबादेत काँग्रेस नेते अधीर रंजन यांच्यावरही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
पश्चिम बंगालमधील बहारामपूरचे काँग्रेस उमेदवार अधीर रंजन चौधरी यांना विरोध करण्यात आला. ते आज शनिवारी सकाळी बहारामपूरच्या वॉर्ड क्रमांक 19 मध्ये प्रचार करत होते. या घटनेच्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कोपऱयावर टीएमसीचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसत आहे. जेव्हा अधीर आपल्या समर्थकांसह आले, तेव्हा टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांना ढकलण्यास सुरुवात केली. अधीर यांनाही ढकलले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, ही घटना वॉर्डमधील टीएमसीचे नगरसेवक भीष्मदेव कर्माकर यांच्या उपस्थितीत घडली.
तणावाची परिस्थिती आणि वाद होऊ नये, मतदारांची सोय वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकरिता 4,660 सहायक मतदान केंद्रे उभारण्यास मंजुरी दिली आहे.


























































