कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा! गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे सत्यतेने मांडला जात नाही. हा इतिहास भरकटवला जात आहे. मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे, व्यक्तीच्या नाही. राजकारणात लोक इकडून तिकडे व्यवहाराकरिता जातात, पदाकरिता जातात, एवढेच नाही तर काही लपवण्याकरिता आणि स्वतःला वाचवण्याकरिताही जातात. अशा कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा, असा अप्रत्यक्ष टोला वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज लगावला. सफाळे येथे शिवसेना उपनेते उदय बंधू पाटील यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.

लोकांचे प्रेम पैशाने मिळत नाही, गुंडागर्दी करून मिळत नाही आणि पदांनीही मिळत नाही. हे प्रेम मिळवण्यासाठी गोरगरीबांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. उदय बंधूंनी प्रत्येक घटकात सागरी, नागरी व डोंगरी या तिन्ही ठिकाणी प्रेम मिळवले आहे. जिल्ह्यात तुम्ही कुठेही गेलात तरी उदय पाटील म्हणून कोणी संबोधित नाही. सर्वच जण त्यांना उदय बंधू म्हणूनच ओळखतात. बंधू म्हणजे मोठा भाऊ, उदय बंधू यांनी मोठ्या भावाची जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावली आहे, असेही गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • माझे मन साफ आहे, त्यामुळे मला मरणाचीसुद्धा भीती वाटत नाही. काही लोकांचे मन साफ नाही, त्यामुळे त्यांना मरणाची नेहमी भीती वाटते. ज्यांना मरणाची भीती वाटते त्यांचे आयुष्य संपलेले असते, असा घणाघातही नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
  • उदय बंधू यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून शिवसेनेची धुरा सांभाळली आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार त्यांच्या नसानसात भिनले आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकारणातील खोके आणि गद्दारी त्यांच्याकडे आली नाही, असे गौरवोद्‌गार शिवसेना नेते विनायक राऊत यांनी यावेळी काढले.

याप्रसंगी शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील, संपर्कप्रमुख विलास पोतनीस, पालघर जिल्हा यंत्रणा प्रमुख अमोल कीर्तिकर, उपनेते उत्तम पिंपळे, उपनेत्या ज्योती ठाकरे, सहसंपर्कप्रमुख विकास मोरे, अजय ठाकूर, जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, प्रथमेश राऊत, अनुप पाटील, डॉ. विश्वास वळवी, जयेंद्र दुबळा, जितेंद्र पामाळे, भीमसिंग कुराडे, मनोज संखे, अनिल ठाकरे, मोहन राणे आदी उपस्थित होते.