
मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली होती. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे खासगी कंपन्यांनी मात्र ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. नायरा एनर्जीनंतर आता शेल इंडिया कंपनीने 1 एप्रिलपासून इंधनाच्या दरात मोठी दरवाढ जाहीर केली आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 109 डॉलर पर्यंत पोहोचल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी दरवाढ रोखून धरली असली तरी वाढत्या तोट्यामुळे खासगी कंपन्यांनी आपल्या दरात सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. शेल इंडियाने पेट्रोलच्या दरात 7.41 रुपये आणि डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर खासगी पंपांवर पेट्रोल 119 रुपये तर डिझेल 123 रुपये प्रति लीटरच्या आसपास पोहोचले आहे.
सरकारी कंपन्यांचे दर (प्रति लिटर)
मुंबई – पेट्रोल 103.54 रुपये, डिझेल 90.03 रुपये
दिल्ली – पेट्रोल 94.77 रुपये, डिझेल 87.67 रुपये
कोलकाता – पेट्रोल 105.45 रुपये, डिझेल 92.02 रुपये
बंगळुरू – पेट्रोल 102.92 रुपये, डिझेल 90.99 रुपये
चेन्नई – पेट्रोल 100.80 रुपये, डिझेल 92.39 रुपये
प्रिमियम पेट्रोलच्या दरा वाढ
दरम्यान, 1 एप्रिल रोजी इंडियन ऑइलने XP100 पेट्रोलच्या दरात 11 रुपये प्रति लिटरने वाढ केली होती. या वाढीनंतर त्याचे दर 149 रुपयांवरून वाढून 160 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले होते. प्रीमियम डिझेल व्हेरियंट ‘एक्स्ट्रा ग्रीन’च्या किमतीतही बदल दिसून आला आहे. आता त्याचे दर 91.49 रुपयांवरून वाढून 92.99 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने ऊर्जा संकट
दरम्यान, अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आणि समुद्रात सुरुंग पेरले. जगातील जवळपास 20 टक्के इंधन-गॅस वाहतूक या मार्गावरून होते. मात्र हा मार्गच बंद झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या. युद्ध सुरू होण्याआधी कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 70 डॉलर होती, आता ही किंमत 109 डॉलरपर्यंत पोहोचली आहे.


























































