देशात हायस्पीड रेल्वेला वेग, हैदराबाद-चेन्नईसह तीन बुलेट ट्रेन मार्गांना मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील हाय – स्पीड रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून हैदराबाद-चेन्नई, हैदराबाद-बेंगळुरू आणि पाटणा-सिलीगुडी या तीन बुलेट ट्रेन मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे प्रकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केले होते.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही मार्गांचे DPR सप्टेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीत टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याची शक्यता आहे. संबंधित DPRमध्ये दिलेल्या अंमलबजावणी वेळापत्रकानुसार प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे देशातील विविध भागांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार असल्याची अपेक्षा आहे.

पाटणा-सिलीगुडी बुलेट ट्रेन मार्ग हा वाराणसी-सिलीगुडी उच्च-वेग रेल्वे मार्गाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानातील शहरांमधील प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात रेल्वे बोर्डाने National High-Speed Rail Corporation Limited या संस्थेला सात नवीन उच्च-वेग रेल्वे प्रकल्पांची जलद अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिली होती. यात मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.

या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रेल्वे बोर्डाने प्रत्येक मार्गासाठी स्वतंत्र मुख्य पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रकल्पनिहाय मुख्यालय स्थापन करणे, पूर्वतयारीच्या कामांची यादी तयार करणे आणि करार प्रक्रियेची सुरुवात करणे, यांसारख्या बाबींनाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित हैदराबाद-चेन्नई बुलेट ट्रेनमुळे सध्या लागणारा प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होऊन सुमारे 2 तास 55 मिनिटांवर येणार आहे. त्याचप्रमाणे हैदराबाद-बेंगळुरू मार्गावर हा प्रवास केवळ 1 तास 13 मिनिटांत पूर्ण होईल. वाराणसी-पाटणा-सिलीगुडी मार्गावरही बुलेट ट्रेनमुळे प्रवास सुमारे 2 तास 55 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने देशातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन ‘B28’ तयार करण्याचे लक्ष्यही निश्चित केले आहे. मार्च 2027 पर्यंत ही ट्रेन तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ही ट्रेन BEML या कंपनीकडून बेंगळुरू येथील रेल्वे कोच संकुलात विकसित केली जात आहे.

‘B28’ या बुलेट ट्रेनचा डिझाइन वेग ताशी 280 किलोमीटर असून प्रत्यक्ष कार्यरत वेग ताशी 250 किलोमीटर असेल. या ट्रेनमध्ये पूर्ण वातानुकूलित चेअर कार रचना असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी झुकणारी व फिरणारी आसने, हालचालीत अडचण असलेल्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा तसेच ऑनबोर्ड मनोरंजन प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.