घटस्फोटानंतर वडिलांनी ढोल-ताशांच्या गजरात केलं मुलीचं स्वागत, समाजापुढे ठेवला नवा आदर्श; पाहा Video

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नानंतर मुलगी सासरी सुखी राहावी, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. मात्र, जर नातं ओझं ठरत असेल, तर त्यातून बाहेर पडणे हाच शहाणपणा असतो. हीच सकारात्मकता मेरठमधील एका निवृत्त न्यायाधीशांनी दाखवून दिली आहे. आपली मुलगी विनिता शर्मा हिचा घटस्फोट मंजूर झाल्यानंतर, तिचे वडील ज्ञानेंद्र शर्मा यांनी तिचे स्वागत दु:खात न करता मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात केले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ कौटुंबिक न्यायालयाबाहेरचे हे दृश्य पाहून अनेकांना सुरुवातीला आश्चर्य वाटले. मिळालेल्या माहितीनुसार, विनिता शर्माचा 2018 साली विवाह झाला होता. मात्र, ती तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हती. अखेर अनेक वर्षांच्या खडतर प्रवासानंतर विनिताला न्यायालयातून घटस्फोट मिळाला. घटस्फोट मिळताच तिच्या कुटुंबाने कोर्टाबाहेर ढोल-ताशांचा गजर सुरू केला. नातेवाईकांनी तिथे नृत्य केले आणि उपस्थित लोकांना पेढे वाटले. विशेष म्हणजे, कुटुंबातील सदस्यांनी काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते, ज्यावर प्रणिताचा फोटो आणि “I Love My Daughter” असे संदेश लिहिले होते. मुलीला एकटे न पाडता, संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे हे एक बोलके उदाहरण ठरले.

निवृत्त न्यायाधीश ज्ञानेंद्र शर्मा यांनी आपल्या मुलीचे फुलांनी स्वागत करत तिला घरी नेले. “घटस्फोट म्हणजे आयुष्याचा शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे,” असा संदेश या कृतीतून त्यांनी समाजाला दिला आहे. सामाजिक बंधने झुगारून एका पित्याने आपल्या मुलीच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा केलेला हा सोहळा, सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला असून, अनेकांनी या कुटुंबाच्या धाडसी आणि पुरोगामी विचारांचे कौतुक केले आहे.