IPL 2026 – कर्णधार ऋषभ पंत चमकला! चित्तथरारक लढतीत लखनऊचा हैदराबादवर 5 विकेटने विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात लखनऊने सनरायझर्स हैदराबादवर 5 गड्यांनी मात केली. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात काहीशी डळमळीत झाली होती, मात्र कर्णधार ऋषभ पंतने एकाकी झुंज देत संघाला विजयपथावर नेले. पंतने 50 चेंडूंमध्ये 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांची कर्णधारपदाला साजेसा खेळी केली. त्याला मार्करमने 27 चेंडूत 45 धावांची वेगवान साथ दिली. इतर फलंदाजांनी निराशा केली असली, तरी पंतने संयम आणि आक्रमकता यांचा योग्य मेळ घालत शेवटच्या चेंडूवर संघाचा विजय निश्चित केला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा केल्या होत्या. हैदराबादच्या फलंदाजांना लखनऊच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 157 धावांचे हे माफक आव्हान लखनऊसाठी सोपे वाटत होते, परंतु हैदराबादच्या गोलंदाजांनी सामन्यात रंगत निर्माण केली. अखेर मोक्याच्या क्षणी ऋषभ पंतने आपली अनुभवी खेळी दाखवत लखनऊच्या पारड्यात विजय टाकला. या विजयासह लखनऊने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आहे.