
दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्या आगामी ‘मायसा’ या चित्रपटातील तिचा नवीन लूक प्रदर्शित करण्यात आला असून, याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रश्मिका मंदाना ही कोव्हिड-१९ नंतर सलग हिट चित्रपट देणारी आणि केवळ तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या जोरावर ३००० कोटींची कमाई करणारी एकमेव हिंदुस्थानी अभिनेत्री ठरली आहे.
कोव्हिड काळात ‘पुष्पा’चा धमाका
ज्या काळात बॉलिवूडचे अनेक चित्रपट फ्लॉप होत होते, अशा कोव्हिड-१९ च्या कठीण काळात २०२१ मध्ये ‘पुष्पा: द राईज’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एकट्या घरगुती बॉक्स ऑफिसवर २०० कोटी आणि जगभरात ३०० कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटानंतर रश्मिका खऱ्या अर्थाने ‘नॅशनल क्रश’ बनली. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली.
तीन ब्लॉकबस्टरसह हॅट्ट्रिक
‘पुष्पा’च्या यशानंतर रश्मिका सातत्याने प्रकाशझोतात राहिली. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सीता रामम’ चित्रपटानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिच्याकडे एकापाठोपाठ एक अनेक मोठे चित्रपट आले. केवळ तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या माध्यमातून तिने बॉक्स ऑफिसवर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. कोव्हिड-१९ नंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून ३००० कोटी रुपये कमावणारी ती एकमेव हिंदुस्थानी अभिनेत्री ठरली असून, तिने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे.





























































