
दापोलीतील बाजारपेठेत शनिवारी रात्री भीषण आगीची घटना घडली. या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत चेतन सुरेश जैन यांचे नाकोडा मोबाईल दुकान, साईराज बिपीन मोरे यांचे कटलरी दुकान आणि मंगेश रामचंद्र भैरमकर यांचे प्लॅस्टिक वस्तू दुकान जळाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. हनुमान जयंतीनिमित्त दापोली शहरातील पंचमुखी श्री. हनुमान मंदिरात कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची ये जा सुरु होती. लोकांना दुकानातून धूर येत असल्याचे दिसून आले असता त्यांनी आरडाओरडा केला. दरम्यान, हनुमान मंदिरात कार्यक्रमासाठी योगायोगाने उपस्थित असलेले दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे तात्काळ नगरपंचायत कार्यालयात जाऊन फायर बुलेट घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था केली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दापोली नगरपंचायत प्रशासनाकडे अग्निशामक बंब उपलब्ध नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठी गैरसोय निर्माण झाली. अखेर खेड नगरपरिषदेकडून अग्निशमक बंब बोलावण्यात आला. मात्र खेड येथून अग्निशामक बंब येईपर्यंत दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दापोली शहर परिसर व बाजारपेठेतील रहिवाशांनी केलेल्या मदतीमुळे ही आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आलं.

























































