
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे बंद झालेला ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग पुन्हा सुचारू करण्यासाठी इराण आणि ओमानमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांच्या उप-परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर झालेल्या या चर्चेत तज्ज्ञांनी जहाजांची आवाजाही सुलभ करण्याबाबत अनेक प्रस्ताव मांडले आहेत. जागतिक तेल पुरवठ्यासाठी कणा असलेल्या या मार्गावर सध्या युद्धामुळे मोठा परिणाम झाला आहे.
इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘IRNA’ च्या वृत्तानुसार, दोन्ही देश मिळून होर्मुजच्या सामुद्रधुनीची देखरेख करण्यासाठी एक विशेष योजना आखत आहेत. इराणचे राजनैतिक अधिकारी काजेम गरीबाबादी यांनी सांगितले की, जहाजांना सुरक्षित प्रवासाची खात्री देणे आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे जुने नियम आता लागू होऊ शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे स्वरूप अद्याप गुलदस्त्यात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४८ तासांचा अल्टीमेटम
या राजनैतिक घडामोडी सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धडकी भरवणारा इशारा दिला आहे. “होर्मुजचा मार्ग उघडा, अन्यथा नरकासारख्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागेल,” अशा कडक भाषेत ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला असून “वेळ वेगाने संपत आहे,” असेही त्यांनी बजावले आहे. त्यांचा पूर्वीचा १० दिवसांचा अल्टीमेटम संपत असतानाच हा नवीन इशारा त्यांनी दिला आहे.
























































